छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या चोऱ्या वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चारच दिवसांत तब्बल ६ मोठ्या चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना जणू आव्हानच दिले. आता पोलीस हे आव्हान गांभीर्याने घेतात का, हे पाहणे गरजेचे आहे. प्रोझोन मॉलसमोर चोरट्यांनी हद्दच केली. हनफिज मोबाइल कलेक्शन दुकानाचे शटर उचकटून अवघ्या २० मिनिटांत ४० लाख रुपयांचे १६० मोबाइल चोरून नेले. ही घटना गुरुवारी (१६ जानेवारी) रात्री घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अब्रार जावेद हनफी (रा. जयसिंगपुरा) यांनी चोरीची तक्रार दिली. १६ जानेवारीला रात्री १० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीनंतर विनाक्रमांकाच्या कारमधून चार चोरटे आले. त्यांनी दुकानाच्या शटरची लोखंडी पट्टी तोडून आतील काच फोडली. दोन चोरट्यांनी दुकानात शिरून, तर दोघांनी बाहेर पाळत ठेवून विविध कंपन्यांचे १६० मोबाइल एक बॅगसह तीन खोक्यांमध्ये भरून नेले. दुकानाचे शटर तकलादू होते. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरटे पंचवीशीतील होते.
चोरी क्रमांक २
एपीआय कॉर्नरजवळील सान्या मोटार्समध्ये चोरट्यांनी घुसून कारचे २ महागडे टायर (किंमत ४५ हजार रुपये) चोरून नेल्याची घटना गुरुवारी (१६ जानेवारी) दुपारी समोर आली. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात सान्या मोटार्सचे बॉडीशॉप मॅनेजर अंकुश जाधव यांनी या प्रकरणात तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चोरी क्रमांक ३
मुंबईला मुलीला भेटायला गेलेल्या बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रमोद भीमराव डावरे (वय ६७, रा. सिडको एन १, काळा गणपती मंदिरामागे) यांचे घर फोडून चोरट्यांनी देवघरातील चांदीच्या ७ मूर्ती (किंमत २५ हजार ७०५) चोरून नेल्या. डावरे यांनी सिडको पोलीस ठाण्यात शनिवारी (१७ जानेवारी) चोरीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरी १३ जानेवारीला सायंकाळी ७ ते १४ जानेवारीच्या सकाळी साडेआठदरम्यान कधीतरी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चोरी क्रमांक ४
सय्यद नूर खैसर (वय ४१, रा. ख्वाजानगर, धाराशिव, ह. मु. कौसर मशिदीजवळ, कौसर पार्क, नारेगाव) यांनी सिडको पोलीस ठाण्यात त्यांचा ९१ हजार रुपयांचा ११ ग्रॅम सोन्याचा घरात घुसून चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार केली आहे. गुरुवारी (१६ जानेवारी) त्यांनी तक्रार दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना १४ जानेवारीच्या रात्री १० ते १५ जानेवारीच्या सायंकाळी ५ दरम्यान कधीतरी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चोरी क्रमांक ५
संजय रामेश्वर काबरा (वय ४८, रा. सिडको एन १, पोलीस चौकीसमोर) यांच्या यश ऑटोमोबाइल टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकानातून कामगारानेच मोटारसायकलीचे ३ हजार रुपयांचे ३ चैन स्पॉकेट कीट चोरून नेले. ही घटना शनिवारी (१७ जानेवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. काबरा यांचे दुकान घराच्या खाली आहे. त्यांच्याकडील अनिल बिघोत या कामगाराने ही चोरी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सिडको एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
चोरी क्रमांक ६
शेख रेहान कदीर (वय ३१, रा. हिनानगर, चिकलठाणा) यांच्या घरासमोरून MH 20 FV 2475 क्रमांकाची एचएफ डिलक्स दुचाकी चोरट्याने चोरून नेली. गुरुवारी (१६ जानेवारी) सकाळी सातला दुचाकी जागेवर नव्हती. शेख रेहान यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात २० हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.