छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हर्सूलच्या बेपत्ता ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जुने कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदावरी नदीच्या पात्रात रविवारी (१९ जानेवारी) सकाळी ११ च्या सुमारास मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संजय गोपीनाथ अभंग (वय ४८, रा. महात्मा फुले हौसिंग सोसायटी, जटवाडा रोड, हसूल, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, ते कामानिमित्त बाहेर जात असल्याचे कुटुंबातील सदस्यांना सांगून घराबाहेर पडले होते.
संजय अभंग १७ जानेवारीला बेपत्ता झाले होते. रात्र होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. मात्र ते आढळले नाहीत. अखेर कुटुंबीयांनी हर्सूल पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच रविवारी सकाळी अकराच्या सुमारास जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात स्थानिकांना अभंग यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन दुपारी दोनला मृतदेह पाण्याबाहेर काढून अभंग यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून सायंकाळी सहाला मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संजय यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.