छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एका मोठ्या कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाला सायबर भामट्यांनी अमेरिकी शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ३५ हजार ९४९ रुपयांचा गंडा घातला आहे.
याप्रकरणात गुरुवारी (४ जुलै) वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अनिकेत (नाव बदलले आहे) यांनी तक्रारीत म्हटले आहे, की २ मार्च २०२४ रोजी दुपारी त्यांना फेसबुकवर एक जाहिरात दिसली. शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देऊ. आमच्या व्हाॅट्स ॲप ग्रुपमध्ये सामिल व्हा. त्यामुळे ते त्या ग्रुपमध्ये सामिल झाले. त्यात अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट व प्रॉफिटबाबत नियमित संदेश येत होते.
काही मेसेजेस बघून ग्रुपवर अनिकेत यांनी संदेश पाठविला. त्यांना लगेच प्रतिसाद आला. त्यांना विश्वास बसल्याने त्यांनी सुरुवातीला १० हजार रुपये भामट्यांनी दिलेल्या दिलेल्या खात्यात पाठवले. नंतर २० हजार, नंतर ८० हजार, १ लाख, ४ लाख पाठवले. नंतर सव्वा तीन लाख पाठवले. असे एकूण ९ लाख ३५ हजार ९४९ रुपये अनिकेत यांनी गुंतवले. पण त्यांना खडकूही परत आला नाही. ज्या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी पैसे गुंतवले, ती वेबसाईटही बंद पडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करत आहेत.