छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : शालेय शिक्षण विभागाने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरविण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाला अनेक खासगी शाळांनी केराची टोपली दाखवली असून, अजूनही अनेक इंग्रजी शाळा जुन्याच वेळेनुसार भरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, केवळ कारवाईचा इशारा देणारा शिक्षण विभाग यात बोटचेपी भूमिका घेत असल्याने पालकांत संताप व्यक्त होत आहे. अद्याप अशा एकाही शाळेवर कारवाईचे धाडस शिक्षण विभागाने दाखवलेले नाही, की जाऊन तपासणीही केली नाही.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग हा खासगी शाळांच्या तालावर नाचत असल्याच्या अनेक उदाहरणांची चर्चा होत असते. इंग्रजी शाळा तर शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून मनमानी करत असतात. अनेक नियमबाह्य गोष्टी पालकांवर लादत असतात. असे असूनही अशा शाळांवर कारवाईचे धाडस शिक्षण विभागाला का होत नाही, याबद्दल शंका कुशंका व्यक्त होत असतात. अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध याला कारणीभूत आहेत, अशीही चर्चा होत असते. राज्य सरकारच्या नव्या नियमाच्या अंमलबजावणीबद्दल आताही तेच होत आहे.
राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आदेश काढले. पण अंमलबजावणी करण्याचे ज्यांच्या हातात आहे, त्यांचे हात कारवाईसाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाला अर्थच उरला नाही, अशी चर्चा पालकांत होत आहे. ज्या शाळांनी अगदीच प्रामाणिक अडचणी दाखवल्या त्यांना सकाळी ९ पूर्वी शाळा भरविण्याची परवानगी मिळणार आहे, पण तसाही प्रस्ताव अद्याप कुणी दाखल केलेला नाही. त्यामुळे अडचणी नाहीत, केवळ मनमानी असल्याचे दिसून येत आहे. कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिला आहे, पण त्यांच्या इशाऱ्यालाही खासगी शाळांनी गांभीर्याने घेतलेले नाही. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवस्थापनांच्या शाळांसाठी सरकारचा आदेश लागू आहे.
मुख्याध्यापकांना आदेश काढले आहेत. नियमांचे उल्लंघन कोणी करीत असेल तर त्यांची लवकरच तपासणी मोहीम हाती घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल.
-जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग