सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीसोबत कौटुंबिक वादातून २३ वर्षांच्या विवाहितेने दीड वर्षीय चिमुकल्यासमोर गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पिसादेवी भागात घडली. सोमवारी (१ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास तिने गळफास घेतला होता, गुरुवारी (४ जुलै) मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरती सचिन शिंदे (वय २३, रा. पळशी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती सचिन खासगी कंपनीत नोकरी करतो. तो कामावर गेल्यानंतर आरतीने गळफास घेतला. घरातील सदस्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला फासावरून उतरवून बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास केला जात आहे. आरतीचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. सासरच्या मंडळींसोबत नेहमी वाद होत असल्याची माहिती आरतीच्या भावाने पोलिसांना दिली. गळफास घेण्यापूर्वी तिने भावाला कॉल करून तुझी आठवण येत आहे. तू भेटायला का आला नाहीस, असे विचारल्याचे तिच्या भावाने सांगितले.
सलग दुसऱ्या आत्महत्येने पिसादेवी सुन्न…
याच आठवड्यात पिसादेवीत सलग दुसरी आत्महत्येची घटना घडल्याने रहिवासी सुन्न झाले आहेत. मंगळवारी (२ जुलै) सायंकाळी स्वयंपाकघरात ३७ वर्षीय कांचन देवीदास निकम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती आणि मुलगा हॉलमध्ये बसलेले असताना त्यांना चहा तयार करून आणते, असे सांगून त्या स्वयंपाकघरात गेल्या अन् टोकाचे पाऊल उचलले होते.