छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी परिसरात बी. के.टी. टायर इंडस्ट्रीत दुर्घटना होऊन सुरक्षारक्षक सुनील पंडितराव देशमुख यांचे दोन्ही हात जायबंदी झाले. सुरक्षेची कोणतीही साधने त्यांना कंपनी किंवा सिक्युरिटी एजन्सीने पुरवली नव्हती. त्यामुळे दोन्ही हातांच्या मनगटांची हाडे मोडली. त्यांच्याकडून आता कोणतेच काम होत नाही. अशा स्थितीत दोषी कंपनी आणि सिक्युरिटी एजन्सीने नुकसान भरपाई देण्याची गरज होती. मात्र दोन्हीकडून जबाबदारी टाळण्यात आली असून, कामगार उपायुक्तालयानेही कंपनीला पाठिशी घालत देशमुख यांच्यावर अन्याय केल्याने आता दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न देशमुख यांना पडला असून, त्यांनी आता कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
सुनील देशमुख हे रांजणगाव शेणपुंजीतील स्वामी केशवानंदनगरात राहतात. ते जी. के. सिक्युरिटी सर्व्हिसेस, पुणे यांच्यामार्फत बी. के. टी. टायर इंडस्ट्रीजमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त होते. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पहिल्या शिफ्टमध्ये कंपनीत कामावर असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास ते बी. एस.आर. लोडिंग पॉइंटवरून कोसळले. सुरक्षेची कोणतीही साधने त्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही मनगटांची हाडे मोडून हात जायबंदी झाले. डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. आता ते कोणतेही काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा ?
सुनील देशमुख यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आहेत. त्यांचा खर्च, घराचा हप्ता या सर्व गोष्टींसाठी त्यांची फरपट होत आहे. प्रचंड आर्थिक अडचणीत ते सापडले आहेत. अपघात झाल्यापासून किमान ५ महिन्यांचा पगार देऊ, असे आश्वासन कंपनी व सिक्युरिटी सर्व्हिसेसने दिले होते. मात्र त्यांनी आश्वासन पाळले नाही. कामगार उपायुक्त कार्यालयानेही कंपनीलाच पाठिशी घातले. त्यामुळे कामगार कार्यालय हे कंपनीच्या हितासाठी आहे की कामगाराच्या हितासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता देशमुख हे कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.