छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी आमदार सुभाष झांबड, तनसुख झांबड यांच्यासह ६८ जणांविरुद्ध फ्रॉड केल्याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. अजिंठा अर्बन बँकेत मुदत ठेव ठेवलेल्या व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. चेतन सुभाष भारुका (वय ४२, रा. सुवर्णमध्य अपार्टमेंट, भाग्यनगर, छत्रपती संभाजीगर) यांनी तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचारी व ३६ एफडी कर्जदारांचा समावेश आहे.
चेतन भारुका यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ते अकांऊटींगचे कामे करतात. त्यांना दोन लहान मुली आहेत. त्यांची मांडकी (ता. वैजापूर) येथे वडीलोपार्जीत शेती आहे. वडील सुभाष गुलाबचंद भारुका आरोग्य विभागातून वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झालेले असून त्यांना निवृत्तीवेतन मिळते. शेती व्यवसायातून देखील उत्पन्न मिळते. त्यातून बचत केलेली रक्कम बँकेच्या खात्यात ते जमा करत होते. ऑगस्ट २०२२ मध्ये अजिंठा अर्बन को-ऑप. बँक लि.च्या जाधवमंडी मुख्य शाखेचे व्यवस्थापक चेतन गादीया व उस्मानपुरा शाखेच्या व्यवस्थापक दीपाली कुलकर्णी यांनी भारुका व त्यांच्या वडिलांची भेट घेऊन सांगितले की, इतर बँकांपेक्षा अजिंठा बँकेत मुदत ठेवीवर जास्तीचे व्याजदर दिले जाते. तुम्ही इतर बँकेत रक्कम जमा ठेवण्यापेक्षा अजिंठा अर्बन बँकेत मुदतठेव ठेवा. तुम्हाला ११ टक्के व्याजदराने परतावा देऊ. तुम्हास पाहिजे तेव्हा गरजेला तुमचे पैसे परत देऊ. दोघांवर विश्वास ठेवून भारुका यांनी अजिंठा अर्बन बँकेत एकूण २९ लाख रुपये ठेवले.
अजिंठा बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोटे व बनावट F.D. अगेन्स्ट लोनच्या माध्यमातून मोठमोठ्या रकमेचे कर्ज उचल घेऊन तसेच खोटे व बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र RBI ला सादर करून आर्थिक अपहार केल्याचे RBI च्या पडताळणीमध्ये निदर्शनास आल्याने RBI कडून ऑगस्ट २०२३ मध्ये या बँकेवर आर्थिक निर्बंध येऊन प्रशासकाची नेमणूक झाली, असे भारुका यांना कळले. त्यामुळे यांनी ठेवी परत मिळाव्या म्हणू अजिंठा बँकेच्या जाधवमंडी मुख्य शाखेत जाऊन व्यवस्थापक चेतन गादिया व उस्मानपुराच्या शाखा व्यवस्थापक दीपाली कुलकर्णी यांना भेटून ठेवी परत मागितल्या असता त्यांनी तुमच्या मुदत ठेवी रक्कम तुम्हाला सध्या देऊ शकत नाही. तुमची ठेव रक्कम तुम्हाला काही दिवसांनंतर परत मिळतील, असे सांगितले. त्यानंतर भारुका हे बँकेचे चेअरमन सुभाष झांबड यांना भेटले. त्यांनीसुध्दा, तुमचे पूर्ण पैसे मी परत करेल, तुम्हाला पैसे नाही मिळाले तर मी जबाबदार आहे, असे सांगितले होते. १ एप्रिल २०२४ व २१ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ दरम्यान DICGC इन्शुरन्स क्लेम अंतर्गत भारुका यांना त्यांच्या मुदत ठेव रकमेपैकी १ ते ५ च्या मुदत ठेवीचे मुद्दल एकूण १५ लाख रुपये मिळाले. त्याव्यतिरीक्त मुदत ठेव रकमेचे व्याजासह रक्कम ११ लाख ३५ हजार रुपये बँकेकडून येणे बाकी आहे.
परस्पर एफडी मोडून दुसऱ्याचे फेडले कर्ज…
गेल्या ऑक्टोबरमध्ये भारुका यांना कळले, की त्यांची एक एफडी परस्पर मोडून कर्जदार सोपान डमाले पाटील यांच्या कर्ज परतफेडीसाठी वापरली गेली आहे. सहमती दिलेली नसताना परस्पर हा प्रकार घडल्याने भारुका यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे, डमाले पाटील कोण आहे हेही भारुका यांना माहीत नव्हते. त्यांची एफडी परस्पर मोडून घोटाळा केल्याने त्यांना आता DICGC इन्शुरन्स क्लेम अंतर्गत ती रक्कमही मिळू शकत नाही. हा धक्का सहन न झाल्याने भारुका यांची आई आजारी पडून हृदयविकाराने वारली. वडील सुभाष भारुका (वय ७७) कर्करोगाने ग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोसीन सय्यद करत आहेत.
यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल…
भारुका यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी अजिंठा अर्बन बँकेचे सन २००६ ते २०२३ या काळातील चेअरमन, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी तसेच ३६ एफडी कर्जदार अशा ६८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांची नावे अशी : चेअरमन सुभाष माणकचंद झांबड, घेवरचंद मोतीलाल बोथरा, तनसुख माणकचंद झांबड, नवीनचंद संघवी, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, संजय फुलपगर, हरीष भिकचंद चिचाणी, सुशिल बलदवा, महेश मन्साराम जसोरीया, सोपान तुळशीराम शेजवळ, उमेश डोंगरे, माणिक चव्हाण, रजनी देसरडा, माधुरी अग्रवाल, अनिल धर्माधिकारी, रवींद्र वाणी, संजय मिठालाल कांकरीया, शिरीष गादिया, दादासाहेब गंडे, नितीन रतनलाल मुगदिया, विद्या प्रफुल्ल बाफना, कांचन श्रीमंतराव गोर्डे, अब्दुल पटणी, सुनिल शंकरलाल सवईवाला, दिलीप हिराचंद कासलीवाल. बँकेचे अधिकारी CEO प्रदीप एकनाथ कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ, शाखा व्यवस्थापक चेतन खुशालचंद गादिया, दीपाली देवेंद्र कुलकर्णी, एफडी कर्जदार सुभाष जैन, राजू बाचकर, घेवरचंद सुराणा, विनोद पाटणी, पद्माकर जोशी, दमाले पाटील, एस.एस. पवार, उत्तम गायकवाड, हेमलता सुराणा, राहुल गुजर, रंगनाथ कुलकर्णी, रेश्मा बोरा, प्रशांत फळेगावकर, गणेश दांगोडे, डी.एफ. पारख, रुस्तम गोरे, संतोष सकाहारे, सी. टी. सक्सेना, सबा नौसिन, संतोष पाटील, जगन्नाथ पाटील, मथाजी गोरे, सुनंदा जैस्वाल, पोपट बी. साखरे, महेश जसोरिया, परेश जैन, महेश खंडेलवाल, वंश ढोका, सुरेंद्र जैन, रमेश टकले, डी. आर. पाटील, एस. एस. जैन, साधना अग्रवाल, सुभाष अग्रवाल, रमेश जाधव, बिमल मिश्रा, अनिल वसंत धर्माधिकारी, रवींद्र वाणी.