छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य इमारतीचे उद्घाटन २६ जानेवारी, २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत सर्व विखुरलेले प्रशासकीय विभाग एका छताखाली आणण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची परवड थांबणार आहे. नवी इमारत नक्की कशी आहे, याचा छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने केलेला आढावा…
जिल्हा परिषदेची औरंगपुरा परिसरातील प्रशासकीय इमारत निजामकालीन वास्तूमध्ये होती. ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे सन २००१ पासून नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या इमारतीचा कोनशिला समारंभही झाला होता. १७ सप्टेंबर २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आता इमारत पूर्णत्वाला आली आहे.
तळमजला १८,५३८ चौरस फुटांचा असून, त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण विभाग, स्थायी समिती हॉल, गोदाम, महिला, पुरुष, अपंगासाठी स्वच्छतागृह आहे. पहिला मजला १९,९२६ चौरस फुटांचा असून, त्यात आरोग्य, वित्त, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम, सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण विभागाची कार्यालये आहेत. १८,९८९ चौरस फुटांच्या दुसऱ्या मजल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बैठक हॉल, वित्त, पेन्शन, कृषी, पंचायत, यांत्रिकी विभाग, व्हिडीओ कॉन्फरन्स हॉल आहे. तिसरा मजला १९, ७३१ चौरस फुटांचा असून, त्यात स्वच्छ भारत मिशन, रोहयो, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन विभागाचे कार्यालय आहे.