छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको या मद्यनिर्मिती कंपनीत १५ नोव्हेंबरला पत्र्याची टाकी फुटून त्यातील मकाखाली दबून ४ कामगारांचे बळी गेले. या भीषण दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचेही समोर आले, गुन्हेही दाखल झाले. यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीला दोन नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीने या नोटिसांना केराची टोपली दाखवली. आता कंपनीविरोधात पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
रॅडिको कंपनीतील दुर्घनेची चौकशी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्या पथकाने केली. चौकशीत कंपनी व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर आला. त्यामुळे कंपनीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी खिरोडकर यांनी दोनदा नोटीस बजावून तुमचे म्हणणे सात दिवसांत सादर करा, असे निर्देश कंपनीला दिले होते. मात्र, या नोटिसांना कंपनीने फारसे सिरियस घेतलेले दिसत नाही.त्यामुळे पुढील चार दिवस कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीवरील पुढील कारवाईचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येणार आहे. या कारवाईला शासनाकडून परवानगी मिळताच कंपनीविरोधात न्यायालयात खटला भरण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दुर्घटनेला जबाबदार धरून करमाड पोलिसांनी कंपनीचे सहायक व्यवस्थापक सुरेंद्र खैरनार, महादेव पाटील आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर रिठे यांच्याविरुद्ध गुन्हा केला होता. सर्व संशयितांना उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.