छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बिबी का मकबऱ्यासह अन्य पर्यटन स्थळे आहेत. ती पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. गोव्यात येणारे पर्यटकही छत्रपती संभाजीनगरकडे वळावेत यासाठी शहरातील उद्योजक गोव्यात जाऊन छत्रपती संभाजीनगरचे ब्रँडिंग करणार आहेत.
गोव्यात जगभरातील पर्यटक येतात. त्यांना छत्रपती संभाजीनगरची पर्यटन महती सांगण्यासाठी मासिआ संघटनेचे ३० लघु उद्योजक आज, २ जुलैला सकाळी छत्रपती संभाजीनगर ते गोवा या पहिल्या विमानाने गोव्याला गेले. कोरोना काळापासून शहरात येणारी पर्यटकसंख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा अनोखा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत आणि त्यांची कार्यकारिणी तसेच माजी अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांचे शिष्टमंडळ गोव्याला रवाना झाले.