छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गर्भपात करवून लग्नाला नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आज, ३० जूनला गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ ते जून २०२४ दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विनय गायकवाड (वय ३०, रा. सिडको एन ६) असे संशयित तरुणाचे नाव आहे. तरुणीची विनयसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मैत्रीतून त्याने तिला प्रपोज करत प्रेमाची मागणी घातली. तिनेही त्याच्या बोलण्याला भुलून प्रेम स्वीकारले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. विनय तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा. गेल्या २९ मार्चला धुलिवंदना सणाच्या दिवशी त्याने तिला बळजबरी दारू पाजली. नंतर दुचाकीवर बसवून मुकुंदवाडी रेल्वे गेट ५६ जवळील निर्जनस्थळी नेत तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर तू मला खूप आवडतेस, आपण लग्न करू, असे म्हणून तो तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवत होता. दोघेही दारू पिऊन एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे. ती नशेत असताना तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही करायचा. या शरीरसंबंधाचे मोबाइलमध्ये व्हिडीओही काढायचा. आता तेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तो देत असल्याचे तक्रारीत तरुणीने म्हटले आहे. तरुणी प्रेग्नंट राहिल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला असता त्याने तिला खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करवल्याचेही तक्रारीत तरुणीने म्हटले आहे. त्याच्या नातेवाइकांनी त्याचे लग्न दुसरीकडे जुळवल्याचे तरुणीला कळल्यानंतर तिने त्याला विचारले असता त्याने तरुणीसोबत लग्नाला नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विनयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.