छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या १७३ जागांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणीवेळी एका उमेदवाराच्या बॅगमध्ये चक्क उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या आढळल्या. त्याच्याकडे डॉक्टरांची प्रिस्क्रीप्शन नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धम्मानंद प्रकाश इंगळे (वय २४) असे संशयित उमेदवाराचे नाव असून, तो बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील बोरगाव वसू येथील आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या पोलीस नाईक अन्सार इब्राहिम शेख यांना धम्मानंदकडे औषधी, गोळ्या आढळल्या. त्यांनीच धम्मानंदविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार ते २९ जूनला उमेदवारांची तपासणी करत होते. इंगळेची बॅग तपासली असता त्यांना वेगवेगळ्या कंपनीच्या गोळ्या, सिरप, इंजेक्शन मिळून आले. त्याला विचारणा केली असता खासगी डॉक्टरांकडे कम्पाऊंडर असल्यामुळे अशी औषधी सोबत असते, असे तो म्हणाला.
मात्र त्याच्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी नव्हती. धम्मानंदकडे डीओएक्सटी-एसएल ही एक टॅबलेट, टेझोविन कंपनीची ३० एमजीच्या ३ टॅबलेट, डेक्सोना कंपनीच्या २ एमएलच्या इंजेक्शनच्या ४ बॉटल्स होत्या. ही सर्व औषधी व गोळ्या उत्तेजक म्हणून गणल्या जातात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांत उत्तेजक द्रव्ये सेवन केल्याप्रकरणी आजवर अनेक खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलीस भरतीतील उमेदवाराकडेही अशीच औषध आढळल्याने खळबळ उडाली आहे.