खल्लास गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री ईशा कोप्पीकर तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने कास्टिंग काउचची व्यथा मांडली आहे. ईशाने सांगितले की, वयाच्या १८ व्या वर्षी तिला खूप भयानक आणि घाणेरड्या अनुभवाला सामोरे जावे लागले होते. हे सांगताना ईशाला रडू कोसळले. जेव्हा ईशा कोप्पीकरच्या बाबतीत असे घडले तेव्हा ती नुकतीच करिअरची सुरुवात करत होती.

इशा कोप्पीकरने फिजा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याआधी तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. डरना मना है, पिंजर, एलओसी कारगिल आणि कृष्णा कॉटेज यांसारख्या चित्रपटात काम केलेल्या ईशा कोप्पीकरने तिच्या कारकिर्दीत अनेक आयटम साँग केले आहेत, ज्यात खल्लास आणि इश्क समंदर यांसारख्या नावांचा समावेश आहे. ईशा कोप्पीकरने कास्टिंग काउचबद्दल सांगितले, की अनेकवेळा अभिनेते आणि दिग्दर्शकांचे सचिव मला अयोग्यरित्या स्पर्श करायचे. हात दाबायचा आणि म्हणायचे की तुला नायकांशी जवळीक निर्माण करावी करावी लागेल.

माझ्या काळात अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली. असे खूप कमी लोक आहेत जे अजूनही इंडस्ट्रीत आहेत आणि त्यांनी हार मानली नाही. मी त्यापैकी एक आहे. ईशा कोप्पीकर म्हणाली, की मी १८ वर्षांची होते तेव्हा एका सेक्रेटरी आणि एका अभिनेत्याने कास्टिंग काउचसाठी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांनी मला सांगितले की काम मिळवण्यासाठी तुम्हाला कलाकारांशी फ्रेंडली राहावे लागेल. एका मोठ्या अभिनेत्याच्या कृत्याबद्दल खुलासा करताना ईशा म्हणाली, की एका अभिनेत्याने मला एकट्यात भेटायला सांगितले. तेव्हा मी २३ वर्षांची होते. त्यांचं इतर हिरोइन्ससोबत अफेअर असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. त्याला मी नकार दिला आणि मी एकटी येऊ शकत नाही, असे सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ते एक मोठे स्टार होते. हे सांगताना ईशा रडली.