नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांचे नाते अनेकदा चर्चेत राहिले आहे. अनेक चढउतारानंतर आता दोघांमध्ये समेट झाला आहे. लग्नाबाबत नवाजुद्दीन उघडपणे बोलला आहे. नुकतेच एका मुलाखतीत नवाजला विचारण्यात आले की, लग्न करावे का, त्यानंतर काहीसे आढेवेढे घेतल्यानंतर तो म्हणाला, तुम्ही करू नये…
युट्यूब चॅनलवर रणवीर अलाहाबादियाशी संवाद साधताना नवाजुद्दीन म्हणाला, की मला सांगायचे आहे पण लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात… लोकांनी लग्न करू नये. लग्नाची काय गरज आहे? जर तुम्ही प्रेमात असाल तर लग्नाशिवायही ते फुलू शकते. लग्नानंतर लोक एकमेकांना गृहीत धरू लागतात. तो पुढे म्हणाला की, लग्नानंतर जोडीदारांमधील प्रेम संपुष्टात येते.
तुम्ही एकमेकांशी लग्न केले नसाल तर तुम्ही एकमेकांवर जास्त प्रेम करता. पण लग्नानंतर ते कमी होऊ लागते. मुलं येतात, अनेक गोष्टी घडतात. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि त्यांच्यावर प्रेम करत राहायचे असेल तर लग्न करू नका. नवाज म्हणाला की, समाज आपल्याला २० व्या वर्षी लग्न करण्यास तयार करतो आणि त्यामुळे आपण त्यात आनंदी राहू शकतो असे आपल्याला वाटते. बायको आम्हाला आनंद देईल असं वाटायला लागतं. पण काही काळानंतर तुमच्या कामामुळेच तुम्हाला आनंद मिळतो, असेही तो म्हणाला.
लग्नाचा १४ वा वाढदिवस केला साजरा
काही काळ वेगळे झाल्यानंतर नवाज आणि त्याची पत्नी आलिया मार्चमध्ये पुन्हा एकत्र आले. आलियाने यापूर्वी दावा केला होता की तिने काही वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस एकत्र साजरा केला. आलियाने सांगितले की आता त्यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. तिसऱ्या व्यक्तीमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या होत्या. पण आता त्यांनी या समस्या सोडवल्याचं तिने सांगितलं.