छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दूध दरवाढीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे शनिवारी (२९ जून) संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून आंदोलन केले. भीषण दुष्काळात विकत पाणी घेऊन पशुधनाला सांभाळाले आहे. उत्पादन खर्च ३५ रुपयांवर गेला आहे. त्या तुलनेत भाव उणे १० रुपये म्हणजे २५ रुपये प्रतिलिटर मिळत असल्याने दूध विक्री व्यवसाय संकटात सापडल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अर्थसंकल्पात दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव सरकार देईल ही अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आंदोलक विश्वंबर हाके म्हणाले, की विकतचा चारा- पाणी घेऊन पशुधनाला मुलाप्रमाणे सांभाळत आहोत. सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने दुधाला ४० रुपये हमी भाव जाहीर करणे गरजेचे होते. अधिवेशन काळात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलक शेतकरी जगदीश डवले, गणेश हाके, कचरू दसपुते, बाबासाहेब हुसे यांनी दिला. आंदोलनात मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दुधाला ५ रुपये अनुदान जाहीर केले होते. जाचक नियम व अटी असल्याने १ हजार पैकी १० दूध उत्पादकांना या अनुदानाचा लाभ घेतल्याचेही हाके म्हणाले.