छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तीसगावच्या भारतनगरातील १४ वर्षीय अनुष्का पांडुरंग पदमाने या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी (२८ जून) सायंकाळी नागरिकांनी बैठक घेतली. उद्या, १ जुलैला यासंदर्भात नागरिकांकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे.
अनुष्का पांडुरंग पदमाने (१४) हिचा बुधवारी (२६ जून) राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. ती बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिच्या गळ्यावर खुणा होत्या. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या प्रकरणात आत्महत्या असल्याचे सुरुवातीला वाटत होते, पण नागरिकांना वेगळाच संशय आहे. सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी तिच्या पालकांची व शेजाऱ्यांची चौकशी केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीला भारतनगर, आदर्श कॉलनी, म्हाडा कॉलनीतील नागरिक हजर होते. अॅड. नामदेव सावते, सामाजिक कार्यकर्ते विलास कांबळे, माजी उपसरपंच विष्णू जाधव, फकीरचंद दाभाडे, ईश्वरसिंग तरैय्यावाले, विजय दिवेकर, सतीश महापुरे, पवन दाभाडे, कल्पना वाघमारे, मीना बनकर, सारिका शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीनंतर नागरिकांनी अनुष्काच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.