छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : यशस्विनी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पतसंस्था अध्यक्षा सविता अधाने आणि तिचा पती देविदास अधाने यांना वर्षभरापूर्वी अटक केल्यानंतर पोलीस त्यांचा मुलगा आणि सुनेच्या शोधात होते. या दोघांना अखेर सोमवारी (१० नोव्हेंबर २०२४) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
पवन देविदास अधाने (वय २६) व त्याची पत्नी सौ. श्वेता पवन अधाने (वय २३, दोघेही रा. नवजीवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. अंबादास मानकापेच्या आदर्श पतसंस्थेतील २०२ कोटींच्या घोटाळ्यात त्याचा मुख्य व्यवस्थापक देविदास अधानेलाही अटक झाली होती. त्यानंतर देविदासची पत्नी सविता अध्यक्ष असलेल्या यशस्विनी सहकारी पतसंस्थेतील ४७ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. पोलिसांनी सवितालाही अटक केली. देविदास, त्याची पत्नी सविता कारागृहात असतानाच त्यांचा मुलगा पवन व सून फरारी होते.
पोलिसांना गुंगारा देत नोंदणी विभागात जाऊन त्यांनी जमिनी विकण्याचाही प्रयत्न केला होता. गेल्या वर्षभरापासून पवन, त्याची पत्नी श्वेता मुंबईतून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नात होते. रविवारी ते पडेगावमध्ये येणार असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी अध्यक्षा सविता देविदास अधाने, उपाध्यक्ष मनीषा अंभोरे, संचालिका वर्षा कोळगे, विजया सुरासे, सविता गिराम, अनिता काळे, भाग्यश्री निकम, कविता नागुर्डे, मंदा काकडे, जुबेदाबी शहा, हिराबाई चन्ने, कविता सोनवणे, मंगल मोरे तसेच माजी व्यवस्थापक गणेश शिंदे, व्यवस्थापक पवन देविदास अधाने आणि अध्यक्षाचा पती देविदास अधाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यातील पाच आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
संशयित सून श्वेता मूळची मुंबईची असून, २०२१ मध्ये तिचे लग्न पवनशी राजेशाही थाटात झाले होते. घोटाळा समोर आला तेव्हा ती गर्भवती होती. त्यानंतर मूल झाल्याने तिच्याविषयी काहीशी सहानुभूती होती. सध्या तिचे मूल ८ महिन्यांचे आहे. लग्नानंतर वर्षभरात अधानेने सुनेच्या नावाने एक संस्था उघडून त्यावर इतर संस्थेतील पैसे, कर्जाची रक्कम वळती केली होती. तिच्या वैयक्तिक बँक खात्यातही पैसे वळते झाल्याने तिची अटक गरजेची होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी यशस्विनी पतसंस्थेतील घोटाळा समोर आला होता. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सविताला अटक करण्यात आली होती.