छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : गंगापूरमधून लढण्यासाठी पेटून उठलेल्या आ. सतीश चव्हाण यांनी वेळप्रसंगी तुतारी हाती घेण्याची तयारी केली. भरीसभर सरकारवर टीकाही केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. येत्या २ दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आ. सतीश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अजित पवार गटातून निलंबित केल्याने चव्हाण यांचा तुतारी हाती घेण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला असला तरी, शरद पवार गटातूनही त्यांना प्रचंड विरोध असल्याने त्यांची गोची झाली आहे. अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारला बहुजनांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याचा घरचा आहेर सतीश चव्हाण यांनी दिला होता. आचारसंहिता लागताच १५ ऑक्टोबरला त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक काढले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. पक्ष व महायुती सरकारची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका चव्हाण यांच्यावर तटकरे यांनी ठेवत निलंबित केल्याचे आदेश काढले.
