छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : सहकारी व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ७ रुपये अनुदान देण्याची निश्चित केले आहे. आता दि.१ ऑक्टोबर पासून पुढे ही योजना सुरु राहणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८८३२ शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले असून उर्वरीत अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे,असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनिषा हराळ-मोरे यांनी कळविले आहे.
या योजने अंतर्गत सहभागी दुध प्रकल्पांची अनुदानविषयक देयके जिल्हास्तरीय पडताळणीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही योजना सप्टेंबर महिन्यापर्यंतच राबविण्यात येणार होती मात्र आता या योजनेचा कालावधी दि. १ ऑक्टोबरपासुन पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने दि.२६ सप्टेंबर रोजीच्या शासननिर्णयान्वये घेतला असून ३.५ / ८.५ गुण प्रतीच्या दुधासाठी २८ रुपये दरानुसार प्रति लिटर ७ रुपये अनुदान देणे निश्चित केले आहे.
या योजनेअंतर्गत दि.१ जुलैपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ सहकारी संघ व जिल्ह्याअंतर्गत ता. कन्नड, ता.वैजापुर, ता.फुलंब्री, ता.सिल्लोड, ता.गंगापूर, ता.खुलताबाद, ता. छत्रपती संभाजीनगर इ. तालुक्यातील ३० खाजगी प्रकल्पा मार्फत २०८७२ दुध उत्पादक शेतकरी सहभागी झाले. त्यांच्या एकुण ५५७८८ दुभत्या गायीची नोंदणी अनुदान पोर्टलवर झाली आहे.
सर्व सहभागी ३१ दुध प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांचे १३२ देयकांपैकी ७५ देयके पात्र ठरली असून त्यातील ३९ देयकांचे ८८३२ दुध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या २९०४८ दुधाळ जनावरांचे एकुण अनुदान पात्र ३३ लाख १८ हजार ०७९ लिटर दुधास एकुण १ कोटी ६३ लाख ६७ हजार ६१५ रुपये अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर शासना मार्फत वर्ग करण्यात आली आहे. अनुदान प्रदानाची ही कार्यवाही अविरतपणे सुरु असल्याने माहे – ऑक्टोबर – २०२४ अखेर जिल्ह्यातील उर्वरीत १२६३८ पात्र सहभागी शेतकऱ्यांना त्यांचे ३३५८४ पात्र दुधाळ जनावरांच्या उत्पादीत एकुण ३६ लाख २३ हजार ४५२ लिटर अनुदान पात्र दुधास १ कोटी ७९ लाख ४० हजार ४४० रुपये वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रदान करण्याच्या दृष्टीने जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनिषा हराळ-मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त एन.एस. कदम, सहकार निबंधक (दुग्ध), श्रीमती. आ.भा.काशीकर, यांच्या जिल्हास्तरीय छाननी समितीमार्फत आवाहन करण्यात आले आहे.