छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : साडेचौदा वर्षांची मुलगी घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती मिळून आली. तिला घरी आणले. पण पालक झोपी जाताच ती पुन्हा गायब झाली. मुलीच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथे ही घटना ७ जूनला घडली असून, या प्रकरणात सोमवारी (२४ जून) तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पती-पत्नी मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांची मोठी मुलगी रांजणगाव शेणपुंजीतील एका शाळेत आठवीत शिकते. ५ जूनला रात्री ८ वाजता ती मैत्रिणीकडे जाते म्हणून घरातून बाहेर पडली. रात्रभर आलीच नाही. दुसऱ्या दिवशी ६ जूनला सायंकाळी सातला ती एकतानगरात मिळून आली. त्या दिवशी जेवण करून सर्व जण झोपी गेले असता मुलगी पुन्हा घरातून निघून गेली. ७ जूनला पहाटे पाचला आईला ती घरात दिसली नाही. तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तिला कुणीतरी फूस लावून पळवल्याचा संशय मुलीच्या आईने व्यक्त केला आहे. तिचा शोध पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे घेत आहेत.