छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आजच्या भौतिक युगात प्रेम एकाशी अन् लग्न दुसऱ्याशी सर्रास दिसून येतं… पण तिने ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, त्याच्याशीच घरच्यांपुढे हट्ट धरत लग्नही केलं… प्रेमीयुगुलाचा संसार सुरू झाला… पण त्याचा स्वभावच मनमौजी… त्याला तिचं प्रेम कळलंच नाही… तो स्थिर नव्हता, आर्थिक अडचणीत असायचा… तिने बचत केलेली पुंजी त्याच्या मदतीला उभी केली. तिच्या नावावर तो कर्ज उचलत राहिला, तिचे दागिने विकले…पण तिने प्रेमासाठी सर्वकाही सहन केलं… पण त्याला तिचं प्रेम कळलंच नाही…स्वभाव बदलला नाहीच, मित्र वारल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडसाठी त्यानं स्वतःचा खांदा पुढे केला… तिनेही त्याच्यावर मान टाकत दोघे प्रेमसंबंधात आकंठ बुडाले… या प्रकरणात आता पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी (३ ऑगस्ट) पती, सासू-सासरे यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही अजब प्रेमाची गजब कथा…
वर्षा (नाव बदलले आहे, वय ३१, रा. श्रीरामनगर बीड बायपास) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की वर्षाने १४ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रियकर उमेशसोबत (नाव बदलले आहे) प्रेमविवाह केला होता. तिला एक मुलगा असून, तो चार वर्षांचा आहे. लग्नानंतर ती साधारण पाच वर्षे सासरी एकत्र कुटूंबात राहत होती. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले होते. काही दिवसांनंतर तिच्या लक्षात आले की कार्तिक मनमौजी व लहरी स्वभावाचा आहे. तो कोणतेही काम स्थिरतेने करत नाहीत. आज ना उद्या त्याला जबाबदारीचे भान येईल, या आशेवर वर्षा होती. उमेशने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्यासाठी वर्षाच्या नावावर कर्ज उचलले.
व्यवसाय तोट्यात गेल्याने वर्षालाच कर्ज भरावे लागले. त्याने प्रत्येक ठिकाणी तिचे नाव पुढे करून तिचे सिबिल खराब केले. वर्षाला माहेराहून मिळालेली दागिने व बचत करून खरेदी केलेले सोने निरनिराळ्या कारणांसाठी उमेशने विकले आणि ते पैसेही स्वतःकडे ठेवून घेतले. १९ सप्टेंबर २०२३ रोजी त्याच्या मित्राचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचा मित्र मुंबईला राहत होता. त्यानंतर उमेशचे मुंबईला येणेजाणे वाढले. तो मुंबईतच जास्त वेळ राहू लागला. नंतर वारलेल्या मित्राची गर्लफ्रेंड मोनिकासोबत (नाव बदलले आहे) तो ठाणे येथे राहू लागले. पण वर्षाला खोटे सांगत होता. वर्षाने विचारले की उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. तिला मारहाण व शिवीगाळ करून प्रश्न विचारण्याची तुझी हिंमत कशी होते, असे म्हणायचा.
१५ डिसेंबर २०२३ रोजी उमेश दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याच्या मोबाइलवर मोनिकाचा मेसेज आला. तो वर्षाच्या नजरेस पडला. मागील मेसेज बघितल्यानंतर समजले की उमेशने तिला मेसेज केलेला होता की तो बायकोला सोडून मोनिकासोबत लग्न करणार आहे. ते वाचून वर्षाला मानसिक धक्का बसला. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले, लग्न केले, त्याच्यासोबत इतक्या वाईट स्थितीतही संसार केला त्यानेच अशी फसवणूक केल्याने ती हादरून गेली होती. मोनिका चांगल्या कंपनीत नोकरीला असून तिला चांगला पगार आहे. त्यामुळे उमेशला वर्षामध्ये स्वारस्य राहिले नव्हते.
वर्षाने दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट ती वर्षाला म्हणाली, की आम्ही आता एकमेकांशिवाय राहू शकत नाही. उलट तुझे आणि तुझ्या पतीचे मागील सहा महिन्यांपासून चांगले संबंध नाहीत, असे म्हणाली. वर्षाने सासू, सासऱ्यांना याबाबत सांगितले असता उलट त्यांनीच वर्षाला दमदाटी करून तू माझ्या मुलाचे आयुष्य खराब केले, असे म्हणत शिवीगाळ केली. अखेर वर्षाने सातारा पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विष्णू जगदाळे करत आहेत.