छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : ग्राहकांना दिलेल्या किमतीत योग्य वजन व गुणवत्ता पुर्ण व दर्जेदार वस्तू खरेदी करता यावी व सेवा मिळावी, यासाठी वजन मापे नियंत्रण व अन्न औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे दुकाने व आस्थापनांची वेळोवेळी तपासणी करावी,असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी,सहाय्यक परिवहन अधिकारी मनीष दौंड, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे, राज्य परिवहन विभागाचे पंढरीनाथ चव्हाण, आरोग्य विभागाचे जी. एम. कुंडलीकर, कृषी उपसंचालक कार्यालयाच्या प्रतिनिधी धनश्री जाधव, पशुसंवर्धन विभागाच्या प्रतिनिधी पूनम पवार, पोलीस अधीक्षक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक एम.डी. गोमारे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य अमोल चतुर, अन्वर अली, संगीता धारूरकर व अन्य सदस्यांची उपस्थिती होती.
विविध दुकाने, आस्थापना प्रमाणित केलेली वजन व मापे वापरतात की नाही. त्यात तांत्रिक बिघाड अथवा बदल करून वजनामध्ये कमी वजनाच्या वस्तू ग्राहकांना विक्री केल्या जातात किंवा कसे याबाबतही अशासकीय समिती सदस्यांनी निदर्शनास आणून द्याव्यात व यासंदर्भात शासनास कळवून आवश्यक ती करण्यासाठी संबंधित विभागाने माहिती सादर करावी,अए डॉ. लोखंडे यांनी सांगितले.
शहरामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दुधाच्या टँकरची अधून मधून गुणवत्ता तपासणी करावी. महानगरपालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने आरोग्य विभाग आणि सेतू सुविधा केंद्रावर होत असलेल्या गैरप्रकाराबाबतही कारवाई करावी अशी समिती सदस्यांनी सूचना केली. संगीता धारूरकर यांनी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय असणाऱ्या ठिकाणीच राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे अशी सूचना केली. पाण्याचे अतिरिक्त मूल्य घेऊन एसटी स्टँडवर ग्राहकाकडून पैसे घेतले जातात. त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी. सेतू सुविधा केंद्र अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधांच्या शुल्कची रक्कम सेतू सुविधा केंद्रावर प्रदर्शित करण्यात यावी. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने याबाबत ज्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले शुल्क आकारले जाते त्याबाबतची शुल्क यादी जाहीर करण्याचे मागणी अशासकीय सदस्यांनी केली. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत शिक्षण विभागाने वेळोवेळी तपासणी करून मुलांच्या आरोग्याबाबत पाहणी करणे आवश्यक असल्याच्या सूचना समिती सदस्यांनी मांडल्या.