छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जाऊसोबत प्रेमसंबंध ठेवणारा पती आई-वडील व भावाचे ऐकून माझ्याजवळ येत नव्हता. पत्नी म्हणून वागणूक देत नव्हता, असा गंभीर आरोप २१ वर्षीय विवाहितेने पतीवर केला आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तिने याबाबत तक्रार दिली असून, त्यावरून पोलिसांनी पती, सासू, सासरा व भायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणीचे सासर बिजवाडी असून, सध्या ती मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात आईकडे वर्षभरापासून राहते. तक्रारीत तिने म्हटले आहे, की २१ एप्रिल २०२२ रोजी तिचा विवाह झाला. तिला पतीपासून एकही अपत्य नाही. लग्नानंतर सुरुवातीचे दोन महिने तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. नंतर सासू, सासरे व भाया मानसिक त्रास देऊ लागले.
तिच्या नवऱ्याला तिच्याबद्दल एकाचे दोन करून सांगायचे. त्यावरून तिचा पती तिला दारू पिऊन येत शिवीगाळ करून मारहाण करायचा. आई-वडील व भावाचे ऐकून तिचा पती तिच्याजवळ येत नव्हता. तिला पत्नी म्हणून वागणूक देत नव्हता. रात्रीच्या वेळी कामावरून उशीरा दारू पिऊन घरी आल्यावर घरी येण्यास का उशीर झाला याबाबत विवाहितेने विचारणा केली की तिला हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ करत असे.
सासू, सासरे व भाया हे नेहमी विवाहितेला म्हणायचे की, तुझ्या आई-वडिलांनी म्हणावे तसे लग्न लावून दिले नाही, आम्हाला मानपान दिला नाही. तू हुंडा जास्त घेऊन आली नाही. तुला येथे काही मिळणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. विवाहितेच्या जाऊसोबत पतीचे प्रेमसंबंध असल्याचे तिला कळल्याने तिने त्याला विचारणा केली असता पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली व नांदवण्यास नकार दिला. माहेराहून मोटारसायकल घेण्यासाठी पैसे घेऊन ये तरच तुला आम्ही नांदवू, असे म्हणून घरातून तरुणीला काढून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार इम्तियाज अली इफ्तेखार अली खान करत आहेत.