छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हार्टॲटॅकमुळे उपचार सुरू असताना रुग्ण दगावला. त्यानंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावून रुग्णाच्या नातेवाइकांनी मोठा जमाव हॉस्पिटलमध्ये जमवून शिवीगाळ, धमक्या देत गोंधळ घातला. हा प्रकार ३० जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत सुरू असल्याने अखेर सिटी चौक पोलिसांकडूनच रुग्णाच्या नातेवाइकांविरुद्ध अनधिकृतरित्या जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गणेश कॉलनीतील आयकॉन हॉस्पिटलमध्ये घडला.
या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सुधाकर मिसाळ यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शाहीन बेगम पठाण व तिच्यासोबतचे लाला, संजय कुमार इखारे व अन्य २० ते २५ नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अय्युब मोहम्मद युसूफ शेख (वय ५८, रेंगटीपुरा, जिन्सी छत्रपती संभाजीनगर) असे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
हार्ट ॲटॅक आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर आमचा माणूस अचानक कसा काय मयत झाला, डॉक्टरांनी जाब द्यावा. आमची झालेली हानी भरून द्यावी असे म्हणत मोठमोठ्याने आरडा ओरड करून गोंधळ घालत संशयितांनी गोंधळ घातला. जमलेल्या बेकायदेशीर जमावाने पोलीस व हॉस्पिटल प्रशासनाला वेठीस धरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.