छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नर्सिंगच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करून डोके फोडल्याने पुन्हा रॅगिंगची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी (३ ऑगस्ट) ही घटना घडली. यापूर्वी रॅगिंगची घटना घाटीत घडलेली असल्याने प्रशासन अलर्ट झाले आणि तातडीने ५ जणांची समिती चौकशीसाठी नेमण्यात आली. या समितीने रविवारी दिवसभर चौकशी केली.
नक्की काय झाले?
राष्ट्रीय अवयवदानदिनी घाटीत जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यात काही ज्युनिअर व सीनिअर विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन दुपारी १२:३० वाजता वसतिगृहात सिनीअर विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने सोबतच्या मित्रांनी त्याला अपघात विभागात दाखल केले. त्याची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. बी. एस्सी. नर्सिंग प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या घटनेची तक्रार प्राचार्यांकडे केली.
समितीने दिवसभर केली चौकशी…
आधीच घाटी रॅगिंगमुळे चर्चेत आली असताना पुन्हा तशीच घटना घडल्याने नर्सिंग कॉलेज प्रशासनाने उपप्राचार्य सुजाता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. यात पाठ्यनिर्देशक रूपाली ढाळे, कविता दहिफळे, महादेव गायकवाड आणि आशिष केदारी यांचा समावेश आहे. या समितीने रविवारी दिवसभर विद्यार्थ्यांची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना सादर केला जाईल, असे नर्सिंग कॉलेजचे प्रभारी प्राचार्य भारती पिंपळकर यांनी पत्रकारांना सांगितले, तर घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले, की चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल येईल. अहवाल अँटी रॅगिंग समितीला सादर केला जाईल. रॅगिंग नसेल तर पुढील निर्णय घेतला जाईल. वादात सहभागी विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाहेर काढू, असेही ते म्हणाले.