छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडीतर्फे २५ जुलैपासून एसी, एसटी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली, त्या जिल्ह्यांत जोरदार स्वागत झाले. मोठा प्रतिसाद मिळाला. आता यात्रेचा समारोप बुधवारी (७ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. यानिमित्त आमखास मैदानावर दुपारी दोनला ॲड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती पक्षाच्या जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट यांनी दिली.
पत्रकार परिषदेत अरुंधती शिरसाट यांनी सांगितले, की ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे, एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली पाहिजे, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घाईगडबडीत वाटप करण्यात आलेली ५५ लाख प्रमाणपत्रे रद्द करावीत, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सलोखा कायम राहिला पाहिजे, ही भूमिका गावोगावी पोहोचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली आहे.
या यात्रेत ओबीसींचे अनेक नेते सहभागी होत आहेत. राज्यभरात प्रकाश आंबेडकर यांच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. आता बुधवारी यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल. जालना मार्गे यात्रा छत्रपती संभाजीनगरला येईल. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, असे शिरसाट म्हणाल्या.
भारतीय क्रांती दलातर्फे ओबीसी आरक्षण बचाव परिषद
भारतीय क्रांती दलातर्फे ९ ऑगस्टला दुपारी १ वाजता ओबीसी आरक्षण बचाव परिषद मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर, ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, ओबीसी संघर्ष समितीचे रामभाऊ पेरकर, बिछडा ओबीसी महासंघाचे प्रा. सुदाम चिंचाने, ओबीसी महासंघाच्या सरस्वती हरकळ, एक विचार एक मंचचे संकल्पक प्रवीण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे महेश निनाळे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अंबादास रगडे, डॉ. संग्राम मौर्य, तानाजी भोजने, बंजारा संघटनेचे ग. ह. राठोड, एकनाथ त्रिभुवन आदी उपस्थित राहणार आहेत. या ओबीसी आरक्षण बचाव परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन रमेश साळवे, मच्छिंद्र ढेपे, मिर्झा शफिक बेग, सय्यद अहमद अजीज पटेल, समाधान सावंत, श्रीमंत उगले आदींनी केले आहे.