सिल्लोड/गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली दुचाकी या पिकअपवर जोरात धडकली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना रविवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भराडी ते कन्नड रोडवरील बोरगाव बाजार फाट्यावर घडली.
गणेश रमेश निकम (वय २४, रा. वासडी, ता. कन्नड) व आशिष मंगलसिंग परमेश्वर (वय २५, रा. मढ, जि. बुलडाणा, ह. मु. सिल्लोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गणेश निकम भोकरदन येथील बंधन बँकेत, तर आशिष परमेश्वर त्याच बँकेत सिल्लोडला नोकरीला होता. दोघेही सिल्लोडला रूम करून राहत होते. रविवारी सुटी असल्याने ते गणेशच्या घरी वासडीला नवीनच घेतलेल्या दुचाकीने गेले होते.
जेवण करून सायंकाळी परत सिल्लोडकडे निघाले असता समोर कन्नडकडून भराडीकडे पिकअप धावत होता. त्या पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबले. यामुळे दुचाकी मागून पिकअपवर धडकली. यात गणेश व आशिष गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह फरारी झाला. दोघा जखमींना नागरिकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अज्ञात वाहनाने उडवल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव-बिडकीन मार्गावरील सुलतानपूर गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (४ ऑगस्ट) दुपारी साडेतीनला घडला. नवनाथ रावसाहेब चापे (वय ३८, रा. कदीम शहापूर, ता. गंगापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. नवनाथ चापे काही कामानिमित्त शेंदूरवादा येथे गेले होते. परतताना सुलतानपूर गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. गणेश राऊत यांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने चापे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान शनिवारी रात्री अकराला त्यांचे निधन झाले. रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर कदिम शहापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे.
पावसामुळे दुचाकी घसरून पती-पत्नी गंभीर
छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे भरधाव दुचाकी पावसामुळे घसरून पती-पत्नी जखमी झाले. ही घटना रविवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी सहाला घडली. सुदैवाने एक वर्षाच्या बाळाला मात्र काहीही दुखापत झाली नाही. सिंगी पिंप्री येथील राजू सीताराम चौधरी (वय ३५) व सोनाली राजू चौधरी (वय ३०) हे दाम्पत्य १ वर्षाच्या मुलासह वाळूजहून गंगापूरकडे दुचाकीने (क्र. एमएच २० बीएफ ४९१०) जात होते. इसारवाडी फाटा येथे पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून त्यांची दुचाकी घसरली. यात दाम्पत्य जखमी झाले. सुदैवाने बाळाला खरचटलेही नाही. जखमी दाम्पत्याला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेतून संदीप त्रिंबके यांनी उपचारार्थ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले आहे.