छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयात मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांसोबत आईवरही कांगारू मदर केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहे. गुरुवारी (१ ऑगस्ट) या विभागाचे लोकार्पण करण्यात आले.
घाटी रुग्णालयात दिवसाला जवळपास ६० महिलांची प्रसूती होते. काही वैद्यकीय कारणांमुळे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच किमान १५ मातांची प्रसुती होते. अशा नवजात शिशुंवर प्रकृती स्थिर होईपर्यंत सीआयसीयूमध्ये किंवा आईच्या कुशीत ठेवण्यात प्राधान्य दिले जाते. घाटीत अशा बाळांसाठी विशेष सुविधा नव्हती. अनेकदा अतिदक्षता विभागात ठेवण्यात येत होते. त्यामुळे आई व बाळाची ताटातूट होत होती.
आईच्या स्पर्शातून मिळणाऱ्या मायेपासून नवजात शिशू वंचित राहत होते. आता घाटी रुग्णालयात यासाठी ३० खाटांचे स्वतंत्र कांगारू मदर केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने दीड कोटीतून हे केंद्र साकारण्यात आले आहे. यासाठी नवजात शिशूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. एस. देशमुख, सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल जोशी यांनी प्रयत्न केले.