छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी (३ ऑगस्ट) पार पडली. जानेवारीनंतर तब्बल ८ महिन्यांनी नियोजन समितीच्या बैठकीचा मुहूर्त लागला. याबैठकीच्या निमित्ताने राजकीय पेरणी करण्यात आल्याचे दिसून आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया आणि सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. ३.३० तास चाललेल्या बैठकीत आर्थिक आकडेमोड कमी अन् राजकीय कोपरखळ्यांनी एकमेकांना बेजार करण्यातच जास्त वेळ गेला. ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
बैठकीत अन् बैठकीनंतर पॉलिटिकल काय घडलं?
-शुक्रवारी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला जे निवडून आले, त्या सगळ्यांना निमंत्रित केल्याचे सांगून रावसाहेब दानवे यांच्या जखमेवर मंत्री सत्तार यांनी मीठ चोळले.
-सत्तार हे सिल्लोड व जालन्यात मराठा समाजाला संपवत असल्याच्या रावसाहेब दानवेंच्या आरोपाबद्दल सत्तार म्हणाले, की मराठा समाजानेच त्यांना हरविले आहे. खा. कल्याण काळे यांनीही रावसाहेब दानवे यांना डिवचले. ते म्हणाले, की निवडणुकीत सत्तारांऐवजी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली.
-पालकमंत्री झाल्याने शिवसेनेसोबत प्रासंगिक करार वाढला का, असे विचारले असता सत्तार म्हणाले, की माझा करार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून तो काळ्या दगडावरील पांढऱ्या रेषेप्रमाणे आहे. ही शेवटची बैठक आहे असे समजू नये. मी पुन्हा येईन, असे सत्तार यांनी सांगून पुढच्या सरकारमध्येही पालकमंत्री होणार असल्याचे आताच सांगून टाकले.
-दुसरीकडे खा. कल्याण काळे म्हणाले, की सिल्लोडमध्ये सत्तारांच्या विरोधात आमचा उमेदवार असेलच. मंत्री अतुल सावे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या सिल्लोडमधील कार्यक्रमाला सर्वांना निमंत्रण होते. माजी खासदार रावसाहेब दानवेंना निरोप होता की नाही माहीत नाही. सिल्लोडमधील कार्यक्रम शिवसेनेचा होता, असे ते म्हणाले.
-अब्दुल सत्तार पालकमंत्री झाल्यापासून नाराज असलेले आ. संजय शिरसाटही सिल्लोडला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला नव्हते. त्यावर सत्तार म्हणाले, की ते बाहेरगावी असल्यामुळे आले नाहीत.
-भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल मत व्यक्त करताना आ. संजय शिरसाट म्हणाले होते, की ते काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना नव्हे तर सत्तार यांना दाखवले आहेत. त्यावर सत्तार म्हणाले, की मला टीकाटिपण्णी करायची नाही. मला कुणी विरोध केला तरी विरोधक जीवंत राहावा अशी प्रार्थना करणारा मी आहे. निवडणुकीला आ. शिरसाट असो की मी सामोरे जावेच लागते, असा इशाराही त्यांनी शिरसाट यांना दिला.
बैठकीत प्रशासकीय काय झाले…
-बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालन अहवालावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
-सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नियतव्यय (खर्चासाठी राखून ठेवलेली रक्कम) सादर करण्यात आला. त्यात सर्वसाधारण योजनांसाठी ६६० कोटी रुपये, विशेष घटक योजनांसाठी १०४ कोटी रुपये तर आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रासाठी ९ कोटी ९० लक्ष रुपये अशा एकूण ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांची मान्यता देण्यात आली.
-पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शिक्षण आणि आरोग्य या घटकांसाठी प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्याचे नियोजन करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंत्रणांनी सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावी. तसे न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
नियोजन समितीच्या झालेल्या चर्चेत खासदार कल्याण काळे, उपस्थित सर्व आमदार, सदस्यांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी नियोजन आराखड्याचे सादरीकरण केले व आभार मानले. महिला व बालविकास विभागामार्फत गर्भलिंगनिदान विरोधात जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझी मुलगी या कवितेचे जनजागृती पोस्टर विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.