दिवंगत बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा मुंबईतील पाली हिल येथील समुद्रकिनारी असलेला आलिशान बंगला १७५ कोटी रुपयांना विकला गेला आहे. यापूर्वी हा बंगला पाडण्याची योजना होती, मात्र आता त्याचे रूपांतर आलिशान अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये करण्यात येणार आहे.
ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने सी-फेसिंग ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याचे चटईक्षेत्र ९, ५२७ चौरस फूट इतके मोठे आहे आणि ते १ लाख ६२ हजार चौरस फूट दराने विकत घेतले आहे. खरेदी किंमतीव्यतिरिक्त त्यावर ९.३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि सुमारे ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. दिलीप कुमार यांनी सप्टेंबर १९५३ मध्ये अब्दुल लतीफ यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता. तथापि, १९६६ मध्ये सायरा बानोसोबत लग्न झाल्यानंतर दिलीप कुमार पत्नीसोबत राहण्यासाठी त्या बंगल्यातून बाहेर पडले.
आता द लीजेंड नावाच्या पुनर्विकास प्रकल्पात फोर आणि फाइव्ह बीएचके फ्लॅट्स असतील. याव्यतिरिक्त या प्रकल्पात दिलीप कुमार यांना समर्पित २ हजार स्क्वेअर फूट संग्रहालयदेखील समाविष्ट असेल. २०१६ मध्ये दिलीप कुमार यांनी आशा ग्रुपसोबत या आलिशान प्रकल्पासाठी विकास करार केला होता. विकासकाने २०२३ मध्ये घोषणा केली की इमारतीमध्ये १५ हाय-एंड अपार्टमेंट असतील. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यातून ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.