छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तलवारीने केक कापणाऱ्या संजय दत्तात्रय महारगुडे (वय ३५, राजाबाजार, कुंवारफल्ली) या ठेकेदाराला सिटी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तलवारही जप्त केली आहे. गुरुवारी (१ ऑगस्ट) कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
संजय महारगुडे रस्ते बांधकामाचा ठेकेदार आहे. त्याचा ३१ जुलैला वाढदिवस होता. राजाबाजार भागात गर्दी करून त्याने वाढदिवसाचा केक तलवारीने कापला. चेल्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेतले तेव्हा त्याच्या हातात तलवार होती. ही तलवार उंचावून तो परिसरात दहशत निर्माण करत होता. त्याच्या स्टेट्सला हा व्हिडीओही त्याने ठेवला. व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांपर्यंत पोहोचला. सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी संजयच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके, पोलीस अंमलदार नितीश घोडके, आनंद वाहुळ, गजानन शेळके यांच्या पथकाने कुंवारफल्ली, राजाबाजार भागातील शांती अपार्टमेंटच्या बाजूला राहत असलेल्या संजय महारगुडेला बेड्या ठोकल्या. तलवार जप्त करीत सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवार आणि मोठ्या चाकूने केक कापल्याची कबुली संजयने दिली. संजयला कायमच गुंडगिरीची सवय आहे. कायम तो टोळके घेऊन फिरतो. त्याच्या व्हिडीओला किंग ऑफ सिटी असे कॅप्श दिले आहे. या बनावट सिटी किंगला पोलिसांनी कोठडीत डांबून चांगलीच हौस पुरवली आहे.