कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : राखीव प्रवर्गातून सरपंच झाली, त्यामुळे गावातील तथाकथित उच्चवर्णीयांचा जळफळाट सुरू होता. त्यातून गावातील यात्रेत मानाचा नारळ फोडण्यावरून झालेल्या वादात ॲट्रॉसिटीचे गुन्हेही दाखल झाले… त्यामुळे संताप टोकाला पोहोचला होता… बदल्याची भावना आणि इर्शेने पेटलेल्या भगवान काशीराम कोल्हे (वय ५० वर्षे) याने समर्थकांना हाताशी धरून सरपंच महिलेच्या पुत्राला चाकूने भोसकून यमसदनी पाठवले. ही थरारक घटना कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे गुरुवारी (१ ऑगस्ट) सकाळी सहाच्या सुमारास घडली. चौघांविरुद्ध पिशोर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
नीलेश कैलास सोनवणे (वय ३२, रा. करंजखेड) असे हत्या झालेल्याचे नाव असून, या प्रकरणात सरपंच संगीता कैलास सोनवणे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भगवान काशीराम कोल्हे (वय ५०), मयूर सुभाष सोळुंके (वय ३०), विजय बापू वाघ (वय २२), रुपेश देविदास मोकासे (वय २३), भूषण शंकर कारले (वय २३), धनराज भगवान कोल्हे (वय २२, सर्व रा. करंजखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संगिता सोनवणे या राखीव प्रवर्गातून करंजखेडच्या सरपंच झाल्या आहेत. त्यामुळे भगवान कोल्हे व त्याच्या समर्थकांना राग होता.
गावातील यात्रेदरम्यान मानाचा नारळ फोडण्यावरूनही त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे दोन्ही गटांतील वाद अधिकच पेटला होता. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास नीलेश सोनवणे शेतातील आखाड्यावरून दूध आणायला चालला होता. वाटेतच त्याला अडवून त्याच्या पोटात, पाटीवर, हातावर चाकूने वार करून खून करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत नीलेश रस्त्याच्या कडेला पडलेला ग्रामस्थांना दिसला. ही माहिती नीलेशच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली. त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलीस पाटील दिलीप वाघ यांनी पिशोर पोलिसांना कळवले.
पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, अंमलदार लालचंद नागलोद, करण म्हस्के, गणेश कवाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पिशोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत तुपे यांनी शवविच्छेदन केले. सायंकाळी साडेपाचला शोकाकुल वातावरणात त्याच्यावर करंजखेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. नीलेशच्या पश्चात आई- वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. नीलेशच्या आईने दिलेल्या तक्रारीत राजकीय वादातून आपल्या मुलाचा खून केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी मयूर सोळुंके व विजय वाघ यांना अटक केली असून, भगवान कोल्हेसह इतरांचा शोध घेतला जात आहेत. गावात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.