छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कपिल हम दोनों को मारनेवाला है, उससे पहले उसे मारना पड़ेगा… असे सतत भरवून,चिथावणी देऊन रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरे यानेच यशला कपिलची हत्या करण्यास उद्युक्त केले. त्यामुळेच यशने मित्रांना गोळा करून हत्याकांड घडवले. वाळूज एमआयडीसीतील कोट्यवधी रुपयांच्या अवैध व्यवसायाच्या वर्चस्ववादातूनच कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) या लॉज-हॉटेल व्यावसायिकाची हत्या झाल्याचे आता समोर आले आहे. दोन महिन्यांपासून हत्येची तयारी सुरू होती.
अमर वगळता अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी…
या प्रकरणात सध्या जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. गोगानाथनगर, बेगमपुरा), ठोंबरेचा मेहुणा अमर ऊर्फ सोनू शिंदे (वय ३१, रा. जि. जालना), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, जालना), अमर ऊर्फ सोनू सुरेश शिंदे (३१, रा. कार्ला, ता.जि. जालना) हे अटकेत आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी अमर शिंदे वगळता अन्य आरोपींना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. या सर्वांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सहायक आयुक्त धनंजय पाटील अधिक तपास करत आहेत.
तू खून कर, मी पुढे पाहून घेतो…
कपिल व यश हे पूर्वी शिवरामसाठी काम करत होते. मात्र काही दिवसांपासून कपिल कानाच्या वर जाऊ लागला होता.कपिलचा परिसरातील वाढता वावर व प्रस्थ शिवरामला सहन होत नव्हते. जालन्याचे अनेक गुन्हेगार यशच्या संपर्कात असतात, याची शिवरामला कल्पना होती. बेगमपुऱ्यातील एका कथित गुंडाचा यशसोबत पूर्वीचा वाद आहे. या गुंडासोबत मिळून कपिल आपल्या दोघांना मारण्याचा कट रचत आहेत, आपला जीव धोक्यात आहे, असे शिवराम जाणूनबुजून यशला सांगू लागला. त्यामुळेच यश डोक्यात कपिलबद्दल कमालीचा राग निर्माण झाला. तू खून कर, मी पुढे पाहून घेतो, असे शिवरामने यशला सांगितले होते.
संशयित १२ दिवस राहिले मंदिरात…
अमर पवार जालन्यात गन सप्लायर म्हणून ओळखला जातो. यापूर्वी दोनदा त्याला शस्त्र पुरवताना अटक झाली आहे. त्याने मध्य प्रदेशमधून २५ हजारांत पिस्तूल खरेदी केले व यशला ३५ हजारांत विकले. शिवरामने त्याला यासाठी ५० हजार रुपये दिले होते. जितसिंग आणि यश जिवलग मित्र आहेत. पुण्याच्या कंपनीत नोकरीला असलेल्या विकासला ऑनलाइन १५०० रुपये पाठवून त्यांनी शहरात बोलावून घेतले. जितसिंग आणि यश हे १२ दिवस बेगमपुऱ्याच्या गोगानाथ मंदिरात राहिले. त्यांचा जेवणाचा व बाकी खर्च यश करत होता. १८ जुलैला मध्यरात्री हत्या घडविण्यात आली.
अशी झाली होती हत्या…
वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत १९ जुलैला पहाटे साईबाबा चौकात कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याचा मृतदेह आढळला होता. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले. कपिलसोबत यश व त्याच्या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागरने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्तस्त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला.