वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील पोखरी येथे पूजा प्रवीण सोमासे (वय २०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१ ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास घडली. तिने दीड महिन्यापूर्वी बाळाला जन्म दिला होता. बाळाला पोरकं करण्याचा तिने अचानक निर्णय का घेतला, याबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
पूजा बाळंतपणासाठी माहेरी पोखरीला आली होती. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील वाघाळा हे तिचं सासर आहे. आई, वडील बाहेरगावी गेल्यानंतर पूजाने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा भाऊ युवराज दुपारी दोनला शाळेतून आल्यावर हा प्रकार दिसला. पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, अंमलदार गणेश गोरक्ष यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिस पाटील ज्योती ठुबे यांनी दिलेल्या माहितीवरून शिऊर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.