छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पायी जाणाऱ्या ५५ वर्षीय वृद्धाला मोटारसायकलीने मागून धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर मोटारसायकलस्वार थांबण्याऐवजी पळून गेला. ही घटना २९ जुलैच्या रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणात ३१ जुलैला क्रांती चौक पोलिसांनी मोटारसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र धर्मदेव शास्त्री (रा. शिवाजी हायस्कूलसमोर खोकडपुरा) असे जखमीचे नाव आहे. ते पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह सानप यांचे घरात किरायाने राहतात. ते सरस्वती भुवन शाळेत चपराशी आहेत. हेडगेवार रुग्णालयातील वाॅर्ड क्र. २९ मध्ये ॲडमिट असताना त्यांनी पोलिसांना जबाब दिला. ते घराकडून बंजारा कॉलनीकडे पायी येत असताना मागून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने जोरात धडक दिली. त्यामुळे शास्त्री पडले. अपघातानंतर मोटारसायकलस्वार तिथून पळून गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलून बाजूला केले व शास्त्री यांच्या मोबाइलवरून त्यांची पत्नी संध्या शास्त्री यांना कॉल करून बोलावून घेतले. पत्नी व मुलीने त्यांना रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल केले. नातेवाइकांनी नंतर हेडगेवार रुग्णालयात त्यांना दाखल केले. अधिक तपास पोलीस अंमलदार मीनाक्षी भर्वे करत आहेत.