छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेचे पथक हे साहित्य जप्त करून नेते. ते सामान दंड भरून अतिक्रमण धारक घेऊन जायचे. त्यानंतर आता ते सामानही परत करणे बंद केले आहे. त्याही पुढे जाऊन बुधवारी (३१ जुलै) हे जप्त केलेले साहित्य तिथल्या तिथे चेंदामेंदा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
निर्णय घेण्यामागचे कारण काय?
हर्सूल जलशुद्धीकरण केंद्रात जप्त केलेले साहित्य इतके साचले आहे, की आता ठेवायलाही जागा उरलेली नाही. त्यामुळे आता जप्त केलेले साहित्य जागेवरच नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते साहित्य पुन्हा वापरता येणार नाही अशा रितीने त्याचा चेंदामेंदा करण्यात येईल. मग ती टपरी का असेना, तिचाही जागेवरच सोक्षमोक्ष लावला जाणार आहे. त्यामुळे लोकांनी अतिक्रमण करणाऱ्यांनी आधीच काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.