छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आठवडे बाजारात मोबाइल चोरीला गेल्यानंतर चोरट्याने गुगल पेवरून १ लाख ३९ हजार रुपये ट्रान्सफर केल्याची घटना दर्गा चौकात समोर २९ जुलैला समोर आली.
प्रकाश दगडू भारंबे (वय ७०, रा. गुरुवैभव अपार्टमेंट, ज्ञानेश्वरनगर, गारखेडा) यांनी या प्रकरणात जवाहनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. २८ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास दर्गा चौक, डी मार्टजवळील आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. भाजीपाला खरेदी करून बाजारातून बाहेर पडत असताना फोन करण्यासाठी शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल पाहिला असता दिसून आला नाही. बाजारात भाजीपाला खरेदी केलेल्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली व मोबाईलचा शोध घेतला.
परंतु मोबाईल मिळून आला नाही. भाजीपाला खरेदी करताना कोणीतरी गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते घरी आले. दुसऱ्या दिवशी २९ जुलैला दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी बँक स्टेटमेंट केले असता गुगल पेच्या साह्याने चोराने तब्बल १ लाख ३९ हजार रुपये खात्यातून गायब केल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या मोबाइल किंमत २० हजार रुपये होती. भारंबे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर करत आहेत.