गंगापूर/पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तांदुळवाडी (ता. गंगापूर) आणि ढोरकीन (ता. पैठण) येथे आत्महत्येचा घटना समोर आल्या आहेत. तरुण शेतकऱ्याने विष पिऊन तर वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गंगापूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने विष पिले…
तांदुळवाडी (ता. गंगापूर) शिवारात विष पिऊन गोरख कचरू खरातकर (वय २६, रा. तांदुळवाडी) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (३० जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गोरखच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गोरख लासूर स्टेशन- गंगापूर मार्गावरील तांदूळवाडी शिवारातील रस्त्यावर बेशुद्धावस्थेत विद्यार्थ्यांना दिसला. त्यांनी गोरखच्या कुटुंबीयांना कळवले. कुटुंबीयांनी गोरखला छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई – वडील, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत शिल्लेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ढोरकीनमध्ये वृद्धाची आत्महत्या
ढोरकीन येथील अशोक सूर्यभान मुळे (वय ६८, रा. ढोरकीन, ता. पैठण) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (३१ जुलै) सकाळी समोर आली. घटनेवेळी अशोक मुळे यांची पत्नी व दोन्हीही मुले बाहेरगावी होती. घरी एकट असल्याची संधी साधून त्यांनी इलेक्ट्रिक वायरने लोखंडी अँगलला गळफास घेतला. सकाळी आठच्या सुमारास गल्लीतील काहींनी दरवाजातून आत पाहिले असता मुळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. बुधवारी ढोरकीन येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक सून, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही.