छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रांजणगाव शेणपुंजीतील हॉटेल-लॉज व्यावसायिक कपिल पिंगळे खून प्रकरणाचा मास्टर माईंड शिवराम ठोंबरे याचा मेहुणा अमर ऊर्फ सोनू सुरेश शिंदे (३१, रा. कार्ला, ता.जि. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुन्ह्याच्या कटाबाबत माहिती होती व तोदेखील कटात सामील होता. शिवराम ठोंबरे याच्या सांगण्यावरून त्यानेच जयेश फतेलष्करला गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये ५० हजार रुपये दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अमर शिंदेला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी बुधवारी (३१ जुलै) दिले. गुन्ह्यात यापूर्वी पाच संशयित अटकेत असून, शिंदेची भर पडली आहे. मुख्य संशयित शिवराम ठोंबरे मात्र अद्याप फरारी आहे. गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्यनुर कार (एमएच २०, एफजी ११००) आणि एक मेमरी कार्ड, अमर शिंदे याच्या अंगझडतीत १५ हजारांचा मोबाइल आणि एक मेमरी कार्ड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली होती हत्या…
वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत १९ जुलैला पहाटे साईबाबा चौकात कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याचा मृतदेह आढळला होता. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले. कपिलसोबत यश व त्याच्या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागरने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्तस्त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला.
हे संशयित अटकेत…
मारेकरी जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, जालना), अमर ऊर्फ सोनू सुरेश शिंदे (३१, रा. कार्ला, ता.जि. जालना)