छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत ३० जून २०२५ होती. ती आता वाढवली असून, वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत या नंबर प्लेट बसवून घेता येणार आहेत. त्यानंतर मात्र आरटीओ कार्यालय कारवाई करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या ५ महिन्यांत सुमारे ९५ हजार ०७३ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नाव नोंदणी केली आहे. यापैकी ६० हजार १७७ वाहनांनाच प्लेट बसवून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २०१९ पूर्वीची सुमारे ९ लाख ५० हजार वाहने आहेत. आजही जुन्या वाहनांची संख्या मोठी असल्याने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे २४ ठिकाणांहून नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत तीनदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५, नंतर ३० जून २०२५ तर आता १५ ऑगस्ट २०२५ अशी तिसरी मुदत वाढ दिली आहे. केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.