लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : सीएससीएन वृत्तसेवा) : येथील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर असलेल्या चार दुकानांचे शटर तोडून माल व रोख रक्कम चोरून नेल्याने व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे. अनेकांनी पोलिसांचे झेंगट टाळण्यासाठी आमच्याकडे चोरीच झाली नसल्याचे सांगितले.
लाडसावंगी येथील मुख्य रस्त्यावर असलेले गौरव ज्वेलर्स, दहिवाळ ज्वेलर्स या दोन सोने-चांदीच्या दुकानाचे शटर, एक कापड दुकान तर एक मेडिकल स्टोअर्सचे शटर तोडून रोख रक्कम व दागदागिने चोरांनी लंपास केल्याचे आज, २० जूनला सकाळी समोर आले. आमच्याकडे शटर तोडले पण काही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. एकीकडे लाडसावंगी हे गाव छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. लाडसावंगी गावाला करमाड पोलीस ठाणे आहे. मात्र लाडसावंगी गावात गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस गस्त घालत नाहीत.
कधीतरी आल्यास बाजारपेठेत सायरन वाजवून निघून जातात. गस्त घातली जात नसल्याने चोरांना रान मोकळे झाले आहे. यात लाडसावंगी येथील कोंडके यांच्या कापड दुकानाशेजारी घर असल्याने तिघे दुकानात झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास शटर उघडण्याच्या आवाजाने ते जागे झाले. त्यामुळे चोर पळून गेले. म्हस्के यांच्या हॉस्पिटल शेजारी असलेले मेडिकलमधील पाच हजार रुपये व सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. दोन्ही ज्वेलर्समध्ये किरकोळ चोरी झाली. करमाड पोलीस ठाण्याचे अंमलदार जमादार संजय जगताप, प्रभाकर जाधव यांनी शुक्रवारी सकाळी नऊला येऊन पंचनामा केला.