छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसीतील एका ॲकॅडमीत प्रशिक्षण घेणारी २३ वर्षीय तरुणी वर्षभरापासून बजाजनगरात ड्रायव्हिंग स्कूलच्या शिक्षकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. घरी मैत्रिणींसोबत राहते, असे सांगत होती. पण जेव्हा पार्टनरने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा तिने घरी परतण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी ती घरी परतणार होती, त्याच दिवशी मध्यरात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली… दोघांत असे काय घडले ज्यामुळे तरुणीने टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास आता वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
या प्रकरणात ५५ वर्षीय शेतकऱ्याने (रा. देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव) तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिलीप धर्मा राठोड (रा. बजाजनगर) याच्याविरुद्ध सोमवारी (२९ जुलै) दाखल केला आहे. तक्रारीत तरुणीच्या वडिलांनी म्हटले आहे, की त्यांना एक मुलगा, तीन मुली आहेत. दोन मुलींचे लग्न झालेले असून २३ वर्षीय तिसरी मुलगी वर्षा (नाव बदलले आहे) ही बजाजनगरात राहून सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत होती. २०२१ मध्ये तिचे ॲडमिशन बजाजनगरच्या एका करिअर ॲकॅडमीत करण्यात आले होते. तेव्हापासून ती तिथे शिकत होती.
१० जानेवारी २०२३ रोजी वर्षाने फोनद्वारे वडिलांना कळवले होते, की ॲकॅडमीतील होस्टेलवर चांगली व्यवस्था नसल्याने मी व माझ्या काही मैत्रिणी बजाजनगरात रूम घेऊन राहते. त्यानंतर ती मैत्रिणींसोबत राहत असल्याचे तिच्या वडिलांना माहीत होते. मात्र १७ जून २०२४ रोजी भावाला कॉल करून वर्षाने सांगितले की, मी एक वर्षापासून दिलीप धर्मा राठोड याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. तो मला त्रास देतो. माझी प्रकृती बरी नाही… असे तिने भावाला गितले. त्यावर भावाने तिला “घरी येऊन जा’ असे सांगितले. त्यावर वर्षाने भावाला सांगितले, की उद्या १८ जूनला ग्रामसेवकची परीक्षा आहे. परीक्षा देऊन गावाकडे येते. येथून निघाल्यावर तुला कॉल करते. हे कॉलवरील संभाषण तिच्या भावाने १७ जूनला वडिलांना सांगितले.
१८ जून २०२४ रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भावाच्या मोबाइलवर वर्षाचा कॉल आला. तिच्या मोबाइलवरून दिलीप धर्मा राठोड हा बोलला की “तू छत्रपती संभाजीनगरला येऊ शकतो का?’ त्यावर वर्षाच्या भावाने त्याला काय झाले व माझ्या बहिणीच्या मोबाइलवरून तू का बोलत आहे, असे विचारले. त्यावर दिलीप धर्मा राठोड म्हणाला, की मी तिचा सर दिलीप धर्मा राठोड बोलत आहे. तिने फाशी घेतली आहे. तू छत्रपती संभाजीनगरला आताच ये. त्यामुळे तिच्या भावाने काकाला घटनेबाबत सांगितले. आई आजारी असल्याने वडिलांना सोबत न आणता दोन्ही काकांना घेऊन तो छत्रपती संभाजनगरला आला.
ते १८ जून २०२४ रोजी सकाळी साडेसातला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आले. या ठिकाणी दिलीप धर्मा राठोड व त्याचे काही मित्र भेटले. त्यांनी वर्षाचा मोबाइल दिला व सांगितले की दिलीप व वर्षा सोबत राहत होते. दिलीप झोपलेला असताना तिने फाशी घेतली, असे दिलीपने सांगितले. जाग आल्यानंतर दिलीपने पाहिले की वर्षाने ओढणीने गळफास घेतला आहे. त्याने तिला फासावरून उतरवून घाटीत आणले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. वर्षाचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांनी देवधानोरा येथे आणला. अंत्यविधीनंतर पोलिसांत तक्रार देण्याचे तिच्या वडिलांनी ठरवले. त्यानंतर तिच्या वडिलांनी महिनाभराने २८ जुलैला छत्रपती संभाजीनगरला येत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात तपास करून पोलिसांनी दिलीप राठोडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पित्याने तक्रारीत काय म्हटले?
मुलीचा मृत्यू हा संशयितरित्या झाला आहे. दिलीप राठोड माझ्या मुलीसोबत दिलीप लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तोच तिला लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहण्यासाठी प्रवृत्त करत होता. तिला त्याच्यासोबत राहायचे नसल्याने ती घरी येणार होती. दिलीपनेच तिला फाशी घेण्यास प्रवृत्त केले, असा आरोप वडिलांनी केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राम तांदळे करत आहेत.