छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर युवकाने दीड वर्षे बलात्कार केला. तरुणी पतीपासून विभक्त राहते. तिला ५ वर्षांची मुलगी आहे. त्याने मुलीची व तिची जबाबदारी घेण्याचे आमिष दाखवले. एकत्र खोली घेऊन ते राहत होते. मात्र लग्नाचे नाव काढले की उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात आले आणि ती आई-वडिलांकडे राहायला आली. त्यामुळे युवकाने तिच्या घरी जाऊन तिला बेदम मारहाण केली. अखेर युवतीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी सचिन जालिंदर पोपळघट (रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी बापूनगरात आई-वडिलांसह राहते. घरकाम करून उदरनिर्वाह करते. २०१९ साली तिचे लग्न झाले होते. तिला पतीपासून पाच वर्षांची मुलगी आहे. दीड- दोन वर्षांपासून पतीशी वाद होत असल्याने ती पतीला सोडून आई-वडिलांकडे राहण्यास आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तिची ओळख सचिन पोपळघटसोबत झाली. दोघांत चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. सचिनने तुझ्याशी लग्न करतो. तुझ्या मुलीची जबाबदारी घेतो, असे म्हणून तिचा विश्वास संपादन केला आणि तिचे आई- वडील घरी नसताना तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवू लागला.
तिला मुकुंदवाडी येथील एका हॉटेलमध्ये भांडे धुण्याचे काम मिळाले. मुलीसह ती अंबिकानगरात रूम भाड्याने घेऊन राहण्यास गेली. या दरम्यान सचिन तिला भेटण्यासाठी मुकुंदवाडीत येत होता. मला तुझ्याशी लग्न करेल, तुला व तुझ्या मुलीला सांभाळेल, असे म्हणत त्याने अामिष दाखवून मुकुंदवाडी येथील रूममध्ये सुद्धा तिच्यासेबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोघे मुकुंदवाडी येथील रूम सोडून काही महिने चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत रूम भाड्याने घेऊन राहू लागले.
दोघे एकत्र रूममध्ये राहू लागले…
मुकुंदवाडी व चिकलठाणा येथील रूममध्ये दोघे एकत्र राहत होतो. यादरम्यान, तिने त्याला लग्न कधी करणार याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे, लग्नाचे आमिष दाखवून केवळ शारीरिक संबंध ठेवत आहे हे तरुणीच्या लक्षात आले.
पुन्हा आई-वडिलांकडे परतली…
तरुणी मुलीला घेऊन १२ जुलै २०२४ रोजी चिकलठाणा येथील रूम सोडून बापूनगरात आई-वडिलांकडे सामान घेऊन सचिनला न सांगता राहायला आली. त्यामुळे संतापलेल्या सचिनने तिच्या आई-वडिलांच्या घरी येऊन तिला तू माझ्या बरोबर राहिली नाहीस तर मी तुला पेटवून देईन, अशी धमकी दिली. त्यानंतर सचिन वांरवार तिच्या आई-वडिलांच्या घरी येऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करू लागला. मंगळवारी (३० जुलै) सकाळी आठला बापूनगर येथील घरी येऊन त्याने तरुणी व तिच्या आईला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू माझ्या बरोबर राहिली नाहीस तर मी तुला पेटवून मारून टाकेन अशी धमकी दिली. अखेर तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सचिनविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत.