छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात अनेक गृहप्रकल्प उभारणाऱ्या नामांकित नागपाल बिल्डरच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश ग्राहकांनीच केला. नागपाल ग्रुपचे प्रमुख रमेश नागपाल, त्यांचा मुलगा नीलकंठ नागपाल या दोघांच्या मुसक्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (३० जुलै) सायंकाळी आवळल्या. कांचनवाडी परिसरातील मिडोज हिल मिस्ट या प्रकल्पातील ग्राहकांकडून वन टाइम मेंटेनन्सचे सुमारे ३ कोटी रुपये हडपल्याचा गुन्हा दोघांविरुद्ध दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
नागपाल पिता-पुत्राला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र चौकशीत त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे सायंकाळी अटक करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. या प्रकरणात सोसायटी अध्यक्ष प्रसाद महाजन यांनी २० फेब्रुवारीला सातारा पोलीस ठाण्यात नागपाल पिता-पुत्रांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यात गुन्हा दाखल करून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार करीत आहेत.
काय आहे प्रकरण…
नागपाल प्रोजेक्ट ॲन्ड कन्स्ट्रक्शनद्वारे २०१५ मध्ये कांचनवाडी परिसरात मिडोज हिल मिस्ट नावाने २ बीएचके व रो हाऊसचा भव्य प्रकल्प उभारण्यात आला होता. एकूण १७२ घरांच्या प्रकल्पात प्रसाद महाजन यांच्यासह जवळपास १६१ ग्राहकांनी घरे खरेदी केली. या गृहप्रकल्पाचे २०१६ मध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले. सोसायटीच्या देखभालीसाठी नागपालने वन टाइम मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅटधारकांकडून प्रत्येकी १ लाख ४८ हजार ५२४ रुपये, इलेक्ट्रिसिटी व अन्य कायदेशीर शुल्क म्हणून ५० हजार रुपये घेतले होते. त्यानुसार सर्व सदस्यांचे २ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये जमा झाले होते.
हे पैसे सोसायटीच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, नागपालने प्रतिसाद दिला नाही. सदस्यांनी सहकार विभागाच्या उपनिबंधकाकडे तक्रार नोंदवली. त्यालाही नागपालने केराची टोपली दाखवली. त्यामुळे सदस्यांच्या वतीने प्रसाद महाजन यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. विशेष म्हणजे, नामांकित बिल्डर असल्याने पोलीस कडक कारवाई करतील की नाही, अशी भीती सोसायटी सदस्यांना होती. मात्र पोलिसांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे दाखवून आता या प्रकरणात तपास केला. नागपाल पिता-पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत.