मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्याचे अर्थकारण बदलून टाकणारा मोठाच प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीत येणार आहे. तब्बल २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सने ऑरिक सिटीत येण्यास हिरवी झेंडी दिली असून, सरकारनेही त्यांचे दमदार स्वागत करण्याचे ठरवले आहे. आज, ३१ जुलैला टोयोटो आणि राज्य सरकारमध्ये मुंबईत परस्पर सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे.
चारचाकी मोटारींच्या उत्पादनात जगात अव्वल असलेल्या टोयोटो कंपनीसमोर गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्र असे तीन पर्याय होते. मात्र, त्यांनी महाराष्ट्रातील ऑरिक सिटीला पसंती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांत अनेक बैठका झाल्या. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किमान २० वेळा मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरला भेट दिली.
आता आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार होणार आहे. यावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मासाकाझू योशिमुरा आणि उपाध्यक्ष मानसी टाटा यांची उपस्थिती असेल. या प्रकल्पात ८ हजार जणांना प्रत्यक्ष तर १६ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. प्रकल्पाच्या निमित्ताने महत्त्वाच्या सहायक कंपन्यांचीही उभारणी होईल. २०२७च्या सुरुवातीला या प्रकल्पात पहिली मोटारगाडी तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सहा महिन्यांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. श्री. फडणवीस म्हणाले, की जपानमधील वित्तीय संस्था आणि नामवंत कंपन्यांनी नेहमीच महाराष्ट्राप्रती सहकार्याची भावना बाळगली आहे. त्याचाच हा परिणाम आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याचे अर्थकारण बदलणार आहे.
जेएसडब्ल्यूही २७ हजार कोटी घेऊन येणार…
बिडकीन एमआयडीसीत आणखी एक मोठा प्रकल्प आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लि. कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहननिर्मितीचा प्रकल्प बिडकीनमध्ये साकारणार असून, बिडकीनमधील हाच पहिलाच अतिविशाल प्रकल्प असेल. २७ हजार २०० कोटी रुपये घेऊन जेएसडब्ल्यू छत्रपती संभाजीनगरात पाऊल ठेवणार आहे. यामुळे ५,२०० पेक्षा अधिक जणांना रोजगार मिळेल. प्रकल्पात वार्षिक पाच लाख इलेक्ट्रिक प्रवासी कार व एक लाख व्यावसायिक कार निर्मिती केली जाणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रुप हा स्टील, ऊर्जा, सिमेंट, पेंट्स, स्पोर्ट आदी क्षेत्रात आघाडीवर आहे.