छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडकोतील सुभाषचंद्र बोसनगरात रविवारी (२८ जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मोहाल सिद्धार्थ खैरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने त्याच्या मित्रांना कॉलही केल्याचे समोर येत आहे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. त्याची आई हॉटेलमध्ये काम करते. त्याच्या आईने त्याला मुंबईतील महाविद्यालयात बीसीएच्या शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला होता. मात्र दीड वर्षापासून तो घरीच होता. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मोहालने गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात नेले. मात्र सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिडको पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.