सॅम बहादूरमधील अभिनयासाठी कौतुकाचा वर्षाव झालेल्या विकी कौशलने आपल्या पहिल्याच मसान चित्रपटातून दाखवून दिले होते की, तो पारंपरिक नायकाचा साचा मोडून स्वतःचे स्थान निर्माण करू शकतो. विकी सध्या “बॅड न्यूज’मुळे चर्चेत आहे. विशेष मुलाखतीत त्याने आयुष्यातील टर्निंग पॉइंट, इंटिमेट सीन्स, सोशल मीडिया, वडील होण्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला…
तू तुझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहेस, पण जेव्हा तू अभिनेता होण्याचा निर्णय घेतलास तेव्हा काय झालं?
विकी : माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा एका बहुराष्ट्रीय कंपनीने आम्हाला फील्ड ट्रिपसाठी नेले. आम्हाला तिथे सांगण्यात आले की, तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडून काम कराल तेव्हा तुमची कार्यसंस्कृती अशी असेल. जेव्हा मी माझ्या बॅचसह तिथे गेलो तेव्हा मला जाणवले की मी येथे आनंदी राहू शकत नाही. हे जग माझ्यासाठी नाही आणि मी या जगासाठी नाही. मला तिथे गुदमरल्यासारखे वाटू लागले. मला माहीत होते की मी संगणकावर ९ ते ५ नोकरी करू शकत नाही. मी अभ्यासात मागे होतो असे नाही. माझे वाचन आणि लेखन चांगले होते. मला एका कंपनीकडून नोकरीचे पत्रही मिळाले होते. नंतर मी ठरवलं की मला फक्त अभिनय करायचा आहे.
जेव्हा तू अभिनेता बनण्याची इच्छा व्यक्त केलीस तेव्हा तुझे ॲक्शन डायरेक्टर वडील राज कौशल यांची प्रतिक्रिया काय होती?
विकी : सुरुवातीला ते खूप दुःखी झाले. तरुणपणी खूप कष्ट सोसून त्यांनी आम्हा सर्वांना शिकवले होते. त्यांना मी नोकरी करत सुरक्षित आयुष्य जगताना पहायचे होते. पण मी त्यांना सांगितले की मला तिथे गुदमरल्यासारखे वाटते. तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी पुढे गेलो. पहिल्याच मसान चित्रपटामुळे मी चर्चेत आलो. हा माझ्यासाठी एक चमत्कार होता. कारण मी काही वेगळे केले नव्हते.
सॅम बहादूर या चित्रपटातील तुझ्या कामाचे खूप कौतुक झाले होते, पण बॉक्स ऑफिसवर तो चांगला चालला नाही?
विकी : सॅम बहादूरने बॉक्स ऑफिसवर ९५ कोटींची कमाई केली. जगभरात १०० कोटींचा आकडा पार केला. चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली.
गेल्या काही दिवसांपासून अफवांचा बाजार सुरू आहे की कतरिना आई आणि तू बाप होणार आहेस?
विकी : ही फक्त अफवा आहे. नुसते अंदाज बांधले जात आहेत. जेव्हा ही बातमी खरी ठरेल, तेव्हा मला ती शेअर करताना सर्वाधिक आनंद होईल.