छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टाटा सुमोतून आलेल्या ८ ते १० जणांनी महिलेच्या घरासमोर गाडी उभी करून दोघे घरात घुसले. त्यांनी महिलेला मारहाण करत तिला व तिच्या पतीला किडनॅप करून जीवे मारण्याची धमकी दिली. सातारा पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी (२७ जुलै) गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. ही घटना बीड बायपास भागातील इटखेड्यातील एकतानगरात शुक्रवारी (२६ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
रुबीना शेरु पठाण (वय ३७, रा. रा. इटखेडा, एकतानगर, बीड बायपास) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी घरी असताना रात्री साडेनऊच्या सुमारास पांढरी टाटा सुमो त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून ८ ते १० उतरले. पैकी तीन ते चार लोक बळजबरी रुबिनाच्या घरात घुसले. तुम्ही कोण आहात, आमच्या घरात कशाला आलात, असे त्यांना विचारत असताना एकाने रुबिनाच्या गालात चापट मारली. तिने आरडाओरड सुरू केली असता तिची मुले धावत आली. त्यामुळे घरात घुसलेले लोक बाहेर पळून उभ्या गाडीजवळ ते गेले. महिलेने तिच्या पतीला कॉल केला. त्यावेळी ते लोक म्हणाले, तुझ्या नवऱ्याला बोलावून घे. त्याला सांग शोएब, आहाद (रा. कन्नड) त्याला मारण्यासाठी आले आहेत.
हिंमत असेल तर घरी ये, असे म्हणून ते शिवीगाळ करू. तुला व तुझ्या नवऱ्याला किडनॅप करून घेऊन जाऊ, मारून टाकू, अशी धमकी ते देऊ लागले. त्यामुळे रुबिनाने घराचा दरवाजा बंद करून घेतला. थोड्या वेळाने ते तिथून निघून गेले. त्यानंतर रुबिना सातारा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली. पोलिसांनी तिला मेडिकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. उपचार घेऊन ती घरी आली. तिचे पती हिंगोलीवरून घरी आल्यावर दोघांनी मिळून सातारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.