छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरात पुन्हा एकदा मंगळसूत्र चोर अवतरले आहेत. दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येत ५१ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावून काढला. ही घटना सातारा परिसरातील माऊलीनगरात शुक्रवारी (२७ जुलै) घडली. शनिवारी या प्रकरणात महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरांचा शोध सुरू केला आहे.
प्रतिभा विजय जोशी (वय ५१, रा. माऊलीनगर डिलक्स सोसायटी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी (२६ जुलै) सायंकाळी सहाला त्या नेहमीप्रमाणे मैत्रीणीसोबत भाजीपाला घेण्यासाठी अरुणोदय कॉलनीकडे पायी जात होत्या. दोघे चोर पल्सर दुचाकीवरून मागून आले. मागे बसलेल्याने प्रतिभा जोशी यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण हिसकावले. त्यानंतर दोघेही भरधाव निघून गेले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रतिभा या इतक्या घाबरल्या की त्यांना मोटारसायकलीचा नंबरही पाहता आला नाही. दोघांच्याही अंगात काळे शर्ट, काळी पँट होती. त्यांनी चोरलेल्या मंगळसूत्राची किंमत ६५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत प्रतिभा जोशी यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मंगळसूत्र चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लामभाटे करत आहेत.