छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे (नाना) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती होताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे नानांच्या समर्थक, कार्यकर्त्यांत उत्साह आहे, आनंद आहे, तर दुसरीकडे त्यांचे पारंपरिक विरोधक खा. कल्याण काळे यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाल्याने तेही खुश झाले आहेत. नाना आता येत्या निवडणूक रिंगणात नसणार, त्यामुळे भाजपकडून ही जागा कोण लढणार, यावरून इच्छुकांतही आनंदीआनंद असून त्यांनी आतापासूनच दावेदारी पक्की करायला सुरुवात केली आहे. यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नानांना फोन…
थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी नानांना फोन केला. हरिभाऊ तुम्हाला महाराष्ट्राबाहेर पाठवायचे आहे, तयार राहा, कुणालाही काहीही सांगू नका… हे ऐकून नाना चकीतच झाले. बाकी काय चालले आहे? असे पंतप्रधानांनी विचारताच नाना म्हणाले, व्यवस्थित आहे सर्व. त्यांनी लगेच फोन ठेवला. नानांच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला पारा उरला नाही. तो दिवस नानांनी मतदारसंघातील भेटीगाठींत घालवला अन् मध्यरात्री केंद्र शासनाने राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे त्यांना कळले. पंतप्रधान मोदींनी सकाळी फोनवर जे सांगितले त्याचा उलगडा मध्यरात्री झाला. २९ जुलैला मुंबईला जाणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.
तिथेच राजस्थान राजभवनमधील अधिकारी येतील. त्यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतर पुढचा कार्यक्रम कळेल, असे नाना म्हणाले. शपथविधी तारखेबद्दल अजून माहिती नाही, असे सांगून ते म्हणाले, की पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून पक्षाचे काम करीत आहे. त्याआधी जनसंघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होतो. भाजपने वेळोवेळी विविध पदांवर संधी दिली. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पदापर्यंत गेलो. संघाचा जिल्हा पदाधिकारीही राहिलो. संघ, जनसंघ, भाजपमधील काम करण्याची पद्धत माहित आहे, असे ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीचा उत्तराधिकारी कोण असणार, हे मात्र नानांनी गुलदस्त्यात ठेवले. उमेदवार कोण असेल याचा निर्णय पक्ष घेईल, असे ते म्हणाले. पुंडलिकनगर रोडवरील बागडे यांच्या निवासस्थानी नानांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी दिवसभर गर्दी होती.
फुलंब्रीतून कोण?
३५ वर्षांनंतर फुलंब्रीत भाजपकडून नव्या चेहऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आता दिसत आहे. हरिभाऊ बागडे कधी थांबतात, याकडेच गेल्या अनेक वर्षांत सर्वांचे लक्ष लागले होते. ते आता राज्यपाल झाल्याने इच्छुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. काहींनी तर यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर व फुलंब्री या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र संपर्क कार्यालयही थाटले होते. भाजपमधून सुहास शिरसाट, राधाकृष्ण पठाडे, अनुराधा चव्हाण, विजय औताडे, रामभाऊ शेळके, दामूअण्णा नवपुते, राजेंद्र साबळे, प्रदीप पाटील इच्छुक आहेत.
काँग्रेसमध्ये विलास औताडे, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, वरुण पाथ्रीकर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अभिजित देशमुख तर शरद पवार गटातून पांडुरंग तांगडे, राजेंद्र पाथ्रीकर आणि शिवसेना शिंदे गटातून किशोर बलांडे फुलंब्रीत इच्छुक आहेत. फुलंब्री मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून या गटाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
कल्याण काळेंना सत्तारांच्या शुभेच्छा…
रविवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमात पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची भेट झाली. त्यावेळी सत्तार यांनी काळे यांची गळाभेट घेतली. हरिभाऊ बागडे यांची राजस्थानला राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचा आनंद दोघांतही दिसून आला. सत्तार म्हणाले, की मला कमी दिवसच पालकमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळेल. परंतु तुमच्याकडे खूप वेळ आहे. जे गतिरोधक होते ते राजस्थानला गेले. आता ताण आम्हाला आहे. आमची व्टेंटी व्टेंटी अजून बाकी आहे.
शिरसाट यांचा खैरेंना टोला…
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केल्यानंतर शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आधी खैरे यांनी उमेदवारी आणून दाखवावी, असा टोला लगावला आहे. चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवर उमेदवारी मागवावी. त्यांचे किती वजन आहे हे कळेल. पण उमेदवारी मिळाली नाही तर खैरेंचे वजन संपेल, अशा शब्दांत शिरसाट यांनी खैरेंवर टीका केली.